Uday Samant
Uday Samant Sarkarnama
मुंबई

उदय सामंताची मोठी घोषणा : ४ हजार एकर SEZ मुक्त होणार, शेतकऱ्यांना दिलासा!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प राहिलेल्या खेड-एसईझेड प्रकल्पातील दूस-या टप्प्यातील संपादीत न झालेल्या सुमारे चार हजार एकर क्षेत्र आता शेतक-यांसाठी मुक्त करण्याचा निर्णय लवकर करणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सावंत यांनी मुंबईत नुकतीच केली. माजी खासदार, शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिरुर तालुक्यातील पाबळ व खेड तालुक्यातील पूर, वरुडे व वाफगावच्या शेतक-यांसोबत मुंबईत बैठके घेवून यासाठी सावंत यांना विनंती केली होती. गेली १५ वर्षे ज्या शेतक-यांच्या सातबारावर एसईझेड संपादनाचे शिक्के होते ते आता पुसले जाणार आहेत.

कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने सन २००६ साली खेड-शिरुरमध्ये एसईझेड प्रकल्पाची घोषणा केली. देशी-विदेशी उद्योगपतींसाठी अनेक चांगल्या सुविधांचा हा प्रकल्प जाहीर झाला आणि तेवढ्याच गतीने खेडमधील नऊ तर शिरुरमधील दोन गावांमधून सुमारे १० हजार एकर क्षेत्र जमिन संपादनाची प्रक्रीया सुरू झाली. यातील कनेरसर, निमगाव, दावडी, गोसासी (ता.खेड) व केंदूर (ता.शिरूर) येथील सुमारे ५ हजार एकर क्षेत्र संपादित करीत शेतक-यांना त्या वेळी १७.५ लाख रुपये प्रतिहेक्टरी मोबदला देवून, १५ टक्के परतावा म्हणून स्वतंत्र जागा व शेतक-यांना कंपनीचे प्रस्तावही दिले. याच वेळी उर्वरित पाबळ, पूर, वरुडे व वाफगाव या गावांमधील संपादित करायच्या शेतीक्षेत्रावर संपादनाचे शेरे टाकून ठेवले. मात्र दूसरा टप्पा रद्द् झाला तरी हे संपादनाचे शिक्के ना काढले गेले, ना त्यावर कुठल्याच सरकारने निर्णय घेतला. याच अनुषंगाने ही मागणी आढळराव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री उदय सावंत यांचेकडे लेखी स्वरुपात कळविली. त्यानुसार काल (ता.१३) मुंबईत प्रमुख अधिका-यांसमवेत शेतक-यांची बैठक सावंत यांनी घेतली.

या बैठकीत वरील चार गावांतील प्रमुख शेतक-यांसह आढळराव यांनी वस्तुस्थिती मांडून शेतक-यांवरचा अन्याय दूर करावा व ७/१२ वरील शिक्के काढण्याची मागणी केली. यावेळी बोलताना उद्योगमंत्री उदय सावंत यांनी संपादन शिक्के असलेल्या चार गावांतील ४ हजार एकर क्षेत्रांवरील शिक्के काढण्याच्या निर्णयाची घोषणा केली. या निर्णयाची पुढील २१ दिवसांत कार्यवाही सुरू होईल, अशी ग्वाही दिली. बैठकीस शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, शिरूर-आंबेगाव तालुकाप्रमुख अरुण गिरे, सुनील बाणखेले, खेड उपतालुकाप्रमुख संतोष गार्डी, बैलगाडा संघटनेचे बाळासाहेब जवळेकर, वाफगावचे सरपंच उमेश रामाणे, नितीन कराळे, वरुडेचे सरपंच मारुती थिटे, पाबळचे सचिन वाबळे, विठ्ठल तांबे, मुरली जाधव, गोसासीचे सरपंच संतोष गोर्डे, बापू दौंडकर, शिंदे गट-युवा सेनेचे बापू शिंदे, विशाल पोतले, सतीश फुटाणे, बाळासाहेब माशेरे, पोपटराव गोडसे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT