Uddhav Thackeray Challenge to Modi
Uddhav Thackeray Challenge to Modi Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray on Hindutva : 'नरेंद्र मोदी आणि भाजपने सत्तेसाठी हिंदुत्व सोडलेलं आहे' ; उद्धव ठाकरेंचा आरोप!

Mayur Ratnaparkhe

Shivsena Foundation Day 2024 :  शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजत कार्यक्रमातील भाषणात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्य्यावरून भाजप आणि पंतप्रधान मोदींवर टीका केली. शिवाय, शहरी नक्षलवादाच्या मुद्य्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही तोफ डागली.

'नरेंद्र मोदी आणि भाजपने सत्तेसाठी हिंदुत्व सोडलेलं आहे' असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. तसेच, शहरी नक्षलवादापेक्षाही भयानक लोकशाहीची हत्या करणारा तुमचा शासकीय नक्षलवाद आहे, असं म्हणत एकनाथ शिंदेंनाही प्रत्युत्तर दिलं.

उद्धव ठाकरे म्हणाले, 'आपल्यावर जो आरोप केला जातो की शिवसेनेला हिंदू मतं नाही मिळाली, शिवसेनेला मराठी मतं नाही मिळाली, शिवसेनेला मुस्लीम मतं पडली. होय पडली आहेत. संपूर्ण सर्व देशभक्तांची मतं शिवसेनेला मिळाली आहेत. ते सांगतात शिवसेनेने, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. का तर आपण काँग्रेससोबत गेलो, म्हणून शिवसेनेने हिंदुत्व सोडलं? मी हिंदुत्व सोडलं असं तुम्हाला वाटतंय का?

तसेच 'केवळ आणि केवळ संविधान वाचवण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी, सर्व देशभक्तांनी आम्हाला मतं दिले असतील तर आम्ही हिंदुत्व सोडलं आणि आम्हाला मुस्लिमांनी मतं दिलं असं जर भाजप म्हणत असेल, तर माझं स्पष्ट आणि ठाम मत आहे. की नरेंद्र मोदी आणि भाजपने सत्तेसाठी हिंदुत्व सोडलेलं आहे. हा माझा ठाम आणि स्पष्ट आरोप आहे.' असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

याचबरोबर 'तुम्ही 2014 मधील एनडीए आघाडीचा फोटो बघा. 2019चा एनडीएचा फोटो बघा. कोण कोण होते त्यामध्ये हिंदुत्ववादी? आणि आज जे त्यांच्याबरोबर बसले आहेत, एक चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे काय हिंदुत्ववादी आहेत? या दोघांनी त्यांच्या राज्यात जो जाहीरनामा दिलेला आहे, नरेंद्र मोदींना मी आव्हान देतोय, की तुम्ही चंद्राबाबूंचा जाहीरनामा पूर्ण करणार असल्याचं आंध्रप्रदेशात जावून सांगा.

त्या जाहीरनाम्यात चंद्राबाबू यांनी मुस्लीम समाजाला वचनं दिलेली नाहीत का? नितीश कुमारांनी बिहारमधील मुस्लिमांना आश्वासनं दिलेली नाहीत का? ' असे प्रश्न उद्धव ठाकरेंनी मोदींना विचारले.

तसेच 'आमच्यावर जेव्हा तुम्ही आरोप करता, त्यावेळी तुमच्याच टोप्या घातलेले फोटो किती तरी आहेत. पण आमच्याकडे चोरीमारी नाही. कारण, या मुस्लीम समाजाला माहीत आहे की, शिवसेना वार करेल तो समोरून करेल. त्यांच्यासारखं पाठीमागून वार करणारी आमची अवलाद नाही. आम्ही लढू तर समोरून लढू. पण सरकारी यंत्रणेचा वापर करून, दुरुपयोग करून नाही.' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT