Maratha reservation : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात राज्यातील कानाकोपऱ्यातील मराठा बांधव मुंबईत आझाद मैदानावर धडकले आहेत. जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण सुरु केलं आहे. आंदोलनासाठी केवळ एक दिवसाची परवानगी आहे. पण अंगावर गुलाल पडल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असा पवित्रा जरांगेंनी घेतला आहे. या दरम्यान आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरे यांनी पत्रकारपरिषद घेत मराठा आंदोलनावरुन सरकारला घेरलं. मराठी माणूस मुंबईत नाही येणार तर मग सुरत आणि गुवाहाटीला जाणार का? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. मराठी माणसाची ताकद मराठी द्वेष्ट्यांना दिसत आहे. नाईलाजाने त्यांना न्यायहक्कासाठी मुंबईत यावं लागलं आहे. त्याचं कारण या सरकारने व स्वत:फडणवीसांनी सांगितलं होतं की त्याचं सरकार असतं तर काही दिवसांत त्यांनी यांना न्याय दिला असता. दुसरे एक आहेत त्यांनी तर शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती. आता पर्यंत या लोकांना वापरुन फेकून देण्यात आलं. मग आता मराठा बांधव मुंबईत आले असतील तर त्यांनी आरक्षण द्यायला हवे असे उद्धव ठाकरे म्हणाले.
आमचं सरकार पाडून तुमचं सरकार तुम्ही आणलात मग आमचं सरकार पाडलात कशासाठी? मग आता सरकारने आंदोलकांशी संवाद साधून त्यांना न्याय द्यावा. न्याय हक्क मागण्यासाठी मराठी माणूस मुंबईत नाही येणार तर मग काय सुरत आणि गुवाहाटीला जाणार का? मुंबई ही मराठी माणसाची राजधानी आहे. तो मुंबईतच येणार. शिवाजी महाराजांची शपथ घेऊन ज्यांनी सरकार आल्यावर सहा महिन्यात आरक्षण देऊ असं सांगितलं होतं. ते लोक आता सत्तेत आहेत. त्यांनी आरक्षण द्यायलं हवं. ती त्यांची जबाबदारी आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.
काही पक्षांनी जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवली असं फडणवीस म्हणाले होते. त्यावर विचारलं असता उद्धव ठाकरे म्हणाले, ते कोणाला उद्देशून बोलले, फडणवीसांच्या बंदूकीचा रोख कुणाकडे आहे. हे पहिलं त्यांना विचारा. बंदूक ठेवणारे कोण आहेत, बंदूक ठेवण्यापर्यंतची वेळी तुम्ही का येऊ दिली. का त्यांचा प्रश्न सोडवत नाही. पुन्हा पुन्हा मुख्यमंत्री झाले तरी प्रश्न का सुटत नाही. आता पर्यंत मराठा आंदोलकांना फसवण्यात आलं. शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आश्वासन दिलं. पण प्रश्न पुढे हालला नाही अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
आंदोलक दंगल करायला नाही आलेत
गणेशोत्सव सुरु आहे. मराठी माणसं मुंबईत दंगल करायला आली नाहीत. न्याय हक्कासाठी आली आहेत. त्यांना न्याय देण्याची जबाबदारी सरकारची आहे. ज्यांनी आरक्षण देऊ म्हणून शड्डू ठोकले होते ते लोक आता गावी पळालेत. का फक्त दर्शन घेतात. असा टोला उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता एकनाथ शिंदेंना लगावला. एवढा जनता जनार्दन मुंबईत आला आहे, त्यांना सामोरे जा की, नुसते घरोघरी काय फिरताय असा असही उद्धव ठाकरे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.