eknath shinde uddhav thackeray sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा 'वाघनखां'वरुन CM शिंदेंवर वार; म्हणाले,"..वाघनखं नसली तरी सरकारी नखं..!"

Uddhav Thackeray On Dharavi Project : "मुंबईला अदानी सिटी करण्याचा त्यांचा डाव आहे. कदाचित उद्या मुंबईचे नाव बदलून 'अदानी सिटी' करतील," उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Akshay Sabale

अदानींसाठी मुंबईची विल्हेवाट लावणार असाल, तर धारावीचं कंत्राट रद्द करावे. धारावीकरांचं मिठागर येथे स्थलांतर करता येणार नाही. जर, अदानींना जमल नसेल, तर त्यांनी कंत्राट सोडून द्यावं. पादर्शकपणे पुन्हा नव्यानं कंत्राट काढावं. धारावीकरांना आम्ही हाकलून देणार नाही.

धारावीकरांना 500 स्क्वेअर फुटांचं घर मिळालंच पाहिजे. त्यांच्या उद्योगांची सोय धारावीत झालीच पाहिजे. त्यामुळे मुंबईला अदानींच्या घशात टाकण्याचा डाव शिवसेना उधळून लावेल, असा इशारा शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी शिंदे सरकारला दिला आहे. ते 'मातोश्री' येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, "धारावी ही केवळ झोपडपट्टी नाही. तेथील प्रत्येक घरात एक लहान-लहान उद्योग चालतात. तेथील उद्योगधंद्यांचं काय करणार? मुंबईभर अदानींकडून 'टीडीआर' विकत घेतला पाहिजे, ही अट सरकारनं टाकली आहे. त्याविरोधात आम्ही दंड थोपटले आहेत. पण, योजनांच्या धुरळ्यामागे कंत्राटदार मित्राचं सरकार भलं करू पाहत आहे."

"मोदी ( Narendra Modi ) आणि शहांनी ( Amit Shah ) गुजरातला मुंबईची 'गिफ्ट सिटी' पळवून नेली आहे. मुंबईला अदानी सिटी करण्याचा त्यांचा डाव आहे. कदाचित उद्या मुंबईचे नाव बदलून 'अदानी सिटी' करतील. पण, आम्ही ते होऊ देणार नाही. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं उदाहरण डोळ्यासमोर आहे. मुंबई बचाव नाही, तर मुंबई रक्षक समिती पाहिजे. मुंबईला लुटायचं, तिची तिजोरी रिकामी करायची हे आम्ही होऊन देणार नाही," अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी सरकारला बजावलं आहे.

"अदानींना धारावीचं कंत्राट दिलं आहे. पण, सरकार वारेमाप 'एफएसआय' अदानींना देऊ पाहत आहे. धारावी 590 एकरवर परसली आहे. त्यातील 300 एकरवर गृहनिर्माण होणार आहे. बाकीच्या ठिकाणी माहिम नेचर पार्क, टाटाचं पावर स्टेशन आहे. मात्र, धारावीकरांना पात्र-अपात्रेच्या चक्रात अडकवून धारावीकरांना हाकलून देण्यात येत आहे. परंतु, आम्ही कुणालाही जाऊ देणार नाही. प्रत्येक धारावीकरांच्या मागे उभे राहू. पात्र-अपात्रेचा निकष लावत धारावी रिकामी करून अदानींच्या धशात घालण्याचा प्रकार आहे," असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे.

"मुंबईचे नागरिक संतुलन बिघडविण्याचं हे काम आहे. मानसिक संतुलन बिघडलेले आपल्याला माहिती आहे. काहींच्या मानसिकतेला बुरशी लागली आहे. अशी माणसे यामागे आहेत. पात्र-अपात्र ठरवत नंबर वाढवून अधिकची जागा मागितली जात आहे. त्यात कुर्ल्याची मदर डेअर, दहिसरचा मुंलुंड टोलनाका आणि वीस जागांची मागणी केली जाऊ शकते," असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

"धारावीचा आराखडा कुणाला माहिती आहे का? धारावी नक्की कशी विकसित केली जाणार हे कुणाला माहिती का? याचा कुठेही उल्लेख नाही. अचानक सरकार 'लाडक्या मित्रा'साठी वेगवेगळ्या ठिकाणी झोपडपट्टी योजनेतून जागांचं अधिग्रहण करत आहे. हे कुणासाठी केलं जात आहे? मुंबईचे इतर प्रकल्प होत असलेल्या ठिकाणी तुम्ही नख का लावत आहात? वाघनखे नसली तरी सरकारी नखे का लावली जात आहेत?" अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

"धारावीकरांना मिठागर, दहिसर टोलनाक्यावर स्थलांतरीत करण्याचं सुरू आहे. पण, स्थलांतरीत केलं, तर सोयी सुविधा कोण देणार? अदानींसाठी मुंबईची विल्हेवाट लावणार असाल, तर धारावीचं कंत्राट रद्द करावे. धारावीकरांचं मिठागर येथे स्थलांतर करता येणार नाही. जर, अदानींना जमल नसेल, तर त्यांनी कंत्राट सोडून द्यावं. पादर्शकपणे पुन्हा नव्यानं कंत्राट काढावं. धारावीकरांना आम्ही हाकलून देणार नाही. धारावीकरांना 500 स्क्वेअर फुटांचं घर मिळालंच पाहिजे. त्यांच्या उद्योगांची सोय धारावीत झालीच पाहिजे. त्यामुळे मुंबईला अदानींच्या घशात टाकण्याचा डाव शिवसेना उधळून लावेल," असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT