मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विधानसभेत आज जोरदार भाषण करत भाजपला आव्हान दिले. मर्द असाल तर समोरासमोर येऊन लढा. शिखंडीसारखे वार का करत आहात? माझ्या कुटुंबावर कारवाई केली म्हणून मी घाबरलेलो नाही. पण हे खेळ थांबवा. याचे परिणाम चांगले होणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला.
अंतिम आठवडा प्रस्तावावर सभागृहात बोलताना त्यांनी आक्रमकपणे आपले मुद्दे मांडल. नवाब मलिक हे दाऊदचे हस्तक आहेत, हे केंद्रातल्या यंत्रणांना माहीत नाही का? दाऊदची माणसे कोण हे तरी शोधा. एजन्सी म्हणजे बाण आहेत. भाजप म्हणतील त्या लक्ष्यावर ते वार करतात. याला ठोकायचं, त्याला ठोकायचं, असे चालले आहे. माहिती देणारे तुम्ही, चौकशी करणारे तुम्हीच, सर्व यंत्रणा अशा राबवणारेही तुम्हीच आहात. ईडी आहे की घरगडी, हेच कळत नाही. खरे तर फडणवीस यांना केंद्राने राॅ, सीबीआय अशा संस्थांत कामाल घ्यायला हवे, असा टोमणा त्यांनी मारला.
आधी रामाच्या नावाने मते मागितली. आता दाऊदच्या नावाने मते मागितली जात आहे. गोपीनाथ मुंडे यांनी दाऊदला फरपटत आणण्याची घोषणा केली होता. आता उलटे झाले असून आपण दाऊदच्या मागे फरपटत चाललो आहोत. नुसते आरोप करण्यापेक्षा आपले जवान दाऊदला थेट घुसून का मारत नाही, असा सवाल त्यांनी विचारला.
सध्या केंद्रीय संस्था जे काही करत आहे ते नीच, निंदनीय, विकृत आहे. एकमेकांची कुटुंबाची बदनामी करण्याचे काम सुरू आहे. मर्दासारखे या लढायला. संस्थांचा दुरूपयोग करून आरोप करण्याचे काम सुरू आहे. हिम्मत असेल तर समोरसामोर या. भाजपमध्ये माणूस आला की तो वाल्याचा वाल्मिकी होतो, असे नितीन गडकरी बोलले होते. बरबटलेला माणूस घ्यायचा आणि त्याला स्वच्छ करायचे, हे यांनी ह्युमन लाॅडरंगि सुरू केलं आहे का, असा सवाल त्यांनी विचारला.
तुम्ही चालवलेले या कारवाया कोणी बघत नाही, असे समजू नका. हा छत्रपतींचा लढणारा महाराष्ट्र आहे. या अशा वाटेला जाऊ नका. कोणाचेच भलं होणार नाही. मी घाबरलो म्हणून हे सांगत नाही. सत्तेवर आल्यानंतर लोकांना काय देणार आहोत, हे महत्वाचे आहे. मिळालेल्या संधीचे सोने करायचे की माती, हे आपण ठरवायला हवे.
देवेंद्र फडणवीस यांनी सारखे पेन ड्राईव्ह देण्याची गरज नाही. मी तुमच्यासोबत येतो. तुम्ही जे आता चाळे केलेले आहेत. माझ्या कुटुंबियांची बदनामी केली आहे. याच्यावर टाच, त्याच्यावर टाच असे सुरू आहे. टाका मला तुरुंगात. मी येतो तुमच्याबरोबर. मग फुरसतीने आरोप गोळा करा. खुलासे करून कुठे ऐेकले जात नाही. याचे शेपूट त्याला. त्याचे शेपूट याला, असे सुरू आहे. एवढाच तुमचा जीव जळत असेल तर मी तुरुंगात जायला तयार आहे. कृष्णाला जेथे ठेवले त्या तुरुंगात मला ठेवा, असे आव्हान त्यांनी दिले. आज अनिल देशमुखला आत टाकणार, उद्या मलिकला आत टाकणार, असे हे सांगत फिरतात. हे या यंत्रणांचे दलाल आहेत का, असा सवाल ठाकरे यांनी विचारला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना काय उत्तर देणार, असे मला ही मंडळी विचारतात. बाळासाहेबांनी त्यांना (मोदींना) वाचवलं?यावर बाळासाहेबांना काय उत्तर देणार? मी 2014 मध्ये हिंदू होतो आणि आजही आहे. ज्या शिवसैनिकांनी 1992 च्या वेळी मुंबई वाचवली. त्याला छळू नका. तुमचा सकाळचा शपथविधी यशस्वी झाला असतां तर नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या मांडीला मांडी लावून बसला असता. मी तुमचा पट्टा गळ्यात बांधला असता तर माझ्या कुटुंबीयांवर टाच आली नसती. हे नीच, निंदनीय आणि विकृत आहे. वैयक्तिक दृष्ट्या टार्गेट केलं जातं आहे. यातून नंतर काही सिद्ध होत नाही. माध्यमांनी पण बातम्या दाखवताना तारतम्य दाखवावे, असे आवाहन त्यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.