Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray On Maharashtra Band: मोठी बातमी! शरद पवार, काँग्रेसनंतर आता ठाकरेंचाही निर्णय झाला; महाराष्ट्र बंद मागे, पण...

MVA Maharashtra Band News : राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी विरोध पक्षाने उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिलीय. मात्र कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नसल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलंय.

Deepak Kulkarni

Mumbai News : महाविकास आघाडीकडून पुकारण्यात आलेल्या उद्याचा महाराष्ट्र बंद उच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवला होता. राजकीय पक्षांना कुठलाही बंद पुकारता येत नाही,जर कोणी अशाप्रकारे बंद करत असेल तर कारवाई करण्याचे निर्देशही न्यायालयाने सरकारला दिले होते.

त्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाविकास आघाडीकडून पुकारण्यात आलेल्या उद्याच्या बंदबाबत भूमिका जाहीर करत आपण हा बंद मागे घेत असल्याचे जाहीर केले होते. यानंतर काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या बंदबाबतच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलेले होते. महाविकास आघाडीकडून बंदचा निर्णय मागे घेण्यात आल्याचे स्पष्ट झालं आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बंदऐवजी एक तासभर राज्य सरकारचा निषेध नोंदवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही आता उद्याचा महाराष्ट्र बंद मागे घेत असल्याचा निर्णय घेतला आहे.

पण बंद मागे घेतानाच त्यांनी उद्या शिवसेनाभवनाबाहेर स्वत: या घटनेचा निषेध म्हणून काळी फित लावून आणि काळे झेंडे घेऊन निषेध नोंदवणार असल्याचं म्हटलं आहे.यामुळे आता शुक्रवारी होणारा महाविकास आघाडीचा बंद गुंडाळला असल्याचे आता निश्चित झाले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, मी उद्या सकाळी 11 वाजता शिवसेना भवन इथे चौकात जाऊन तोंडाला काळी फित बांधून बसणार आहे.उद्याचा बंद आम्ही मागे घेत असलो तरी आम्ही शांत बसणार नाही. उद्या आम्ही सगळे तोंडाला काळ्या फिती बांधून बसणार आहोत असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

ठाकरे काय म्हणाले..?

उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी संध्याकाळी महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदवर आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले,मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य नाही, पण न्यायालयाचा आदर राखला पाहिजे. त्यामुळे आम्ही उद्याचा बंद मागे घेत आहोत. मात्र, उच्च न्यायालयाने बंदबाबत जितक्या तत्परतेने निर्णय घेतला, तितक्याच तत्परतेने गुन्हेगारांना शिक्षाही द्यावी,अशी मागणी ठाकरेंनी न्यायालयाकडे केली.

आमचं आंदोलन आम्ही मागे घेणार नाही, मी स्वत: सकाळी 11 वाजता शिवसेना भवनातील चौकात काळी फीत बांधून आंदोलनला बसणार आहे. राज्यभरात मविआचे कार्यकर्ते तोंडाला काळी फीत बांधून, काळे झेंडे हातात घेऊन राज्यभर आंदोलन करतील, असेही उद्धव ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच, आंदोलन करण्याचा अधिकार राहिला की नाही असा खडा सवालही त्यांनी यावेळी केला.

ठाकरे म्हणाले, आम्ही बंद म्हणजे आम्ही दगडफेक करा, हिंसाचार करा, असे म्हटलं नव्हतं. वकील, डॉक्टर, पोलिस यांसह सर्वांनाच आपल्या कुटुंबाची काळजी आहे. बहीण,आईची काळजी आहे. तिचे रक्षण करणार कोण आहे, हे सर्वांच्या मनात आहे. यामुळे बंद करायचा प्रयत्न केला.आम्हांला बंद कायद्यानुसार करता येत नसेल तर तोंडच बंद करणार आहोत.

नाना पटोले काय म्हणाले ?

महाविकास आघाडी म्हणून उद्याच्या बंदबाबात आमचा निर्णय झाला असून जयंत पाटील, उद्धव ठाकरे यांच्यासोबतही आमची चर्चा झाली आहे. त्यानुसार, आम्ही उद्याचा बंद मागे घेत आहोत, तसेच हातात काळे झेंडे आणि हाताला काळी पट्टी लावून शनिवारी 24 ऑगस्ट रोजी दुपारी 11 ते 12 वाजेपर्यंत शांततेनं बसून सरकारचा निषेध नोंदवणार आहोत, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT