uddhav thackeray amit shah.jpg sarkarnama
मुंबई

Thackeray Vs Shah : 'औरंगजेब फॅन्स क्लब'चे अध्यक्ष म्हणणाऱ्या शहांना ठाकरे देणार प्रत्युत्तर; तारीख अन् ठिकाणंही ठरलं!

Akshay Sabale

अजित पवार यांच्या महायुतीतील समावेशामुळे आणि लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर 'संभ्रमा'त असलेल्या कार्यकर्त्यांना मार्ग दाखविण्याचा प्रयत्न भाजपनं रविवारी पुण्यात झालेल्या 'चिंतन' बैठकीच्या माध्यमातून केला. या अधिवेशनातून गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टीकेचे 'लक्ष्य' केलं.

"उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत," अशी घणाघाती टीका गृहमंत्री शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली होती. आता उद्धव ठाकरे यांच्याकडून गृहमंत्री शाह जशास तसे प्रत्युत्तर देण्यात येणार आहे.

गृहमंत्री शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून उत्तर दिलं जात आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. पण, गृहमंत्री शाह यांना उत्तर देण्यासाठी आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर 3 ऑगस्टला पुण्यात मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे अमित शाह यांना मेळाव्यातून उत्तर देणार आहेत. अमित शाह यांनी पुण्यात येऊन उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. आता त्याच पुण्यातून उद्धव ठाकरे अमित शाह यांच्यावर 'ठाकरी शैलीतून' शब्दांचे 'बाण' सोडणार आहेत. भाजप कोणते फॅन्स क्लब चालवते तेही उघड करणार असल्याचं शिवसेना ठाकरे गटातील नेत्यानं सांगितलं. उद्धव ठाकरे काय बोलतात? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अमित शाह काय म्हणाले होते?

"मोदी सरकारनं देशाची सुरक्षा सुनिश्चित केली आहे. देश पुढील दोन वर्षांत नक्षलवाद मुक्त करण्याचा निर्धार आहे. पण, 'औरंगजेब फॅन्स क्लब'कडून देश सुरक्षित राहणार नाही. कसाबला बिर्याणी खाऊ घालणाऱ्यांच्या मांडीवर बसून स्वत:ला बाळासाहेबांचा वारस म्हणविणारे उद्धव ठाकरे 'औरंगजेब फॅन्स क्लब'चे नेते आहेत," असा हल्लाबोल अमित शहांनी केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT