Uddhav Thackeray  Sarkarnama
मुंबई

बाळासाहेब ठाकरेंची जयंती : उद्धव ठाकरे शिवसैनिकांना काय मंत्र देणार?

पक्षप्रमुख म्हणून ठाकरे यांचा बऱ्याच दिवसांनंतर कार्यकर्त्यांशी संवाद होणार

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची 23 जानेवारी रोजी जयंती असून या निमित्ता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे शिवसैनिकांना व्हीसीद्वारे संबोधित करणार आहेत. या निमित्ताने बऱ्याच दिवसांनंतर ठाकरे हे पक्ष कार्यकर्त्यांशी बोलणार आहेत.

या निमित्ताने वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुका आगामी काही दिवसांत जाहीर होण्याची चिन्हे आहेत. त्यानिमित्ताने महापालिकेत भाजप विरुद्ध सत्ताधारी शिवसेना यांच्यातील संघर्ष टिपेला पोहोचला आहे. भाजपच्या नगरसेवकांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या दालनासमोर आंदोलनही केले होते. तसेच शिवसेनेचे हिंदुत्व हे मवाळ झाल्याची टीका भाजप करत आहे, त्याला ठाकरे काय उत्तर देणार याकडेही लक्ष असेल. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवर भाजप सातत्याने टीका करत असल्याने त्याला ते प्रत्युत्तर देतात का, हे पाहावे लागेल. तसेच राज्यात नुकत्याच 106 नगर पंचायतींच्या निवडणुका झाल्या. त्यात शिवसेना चौथ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. त्यावर ठाकरे काय भाष्य करणार, याचीही उत्सुकता राहील.

दक्षिण मुंबईतील माझगाव परिसरात प्रभाग क्रमांक २०९ मध्ये महाराणा प्रताप चौकात महाराणा प्रताप यांचा हा भव्य आणि अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव हे या प्रभागाचे नगरसेवक आहेत. जाधव यांच्या दालनात दिनांक २३ एप्रिल २०१८ रोजी झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार महाराणा प्रताप चौकाचे सुशोभिकरण व महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्याचे निश्चित करण्यात आले. हा चौक नेस्बिट मार्ग आणि शिवदास चापसी मार्ग जंक्शनवर स्थित आहे, जे मुळात वाहतूक बेट आहे व इतर पाच वाहतूक बेटाने वेढलेले आहे. चौकाचे सुशोभिकरण आणि महाराणा प्रताप यांचा पुतळा स्थापित करण्याच्या प्रस्तावाला दिनांक ५ मार्च २०१९ रोजी मंजुरी मिळाली.धुळे येथील शिल्पकार श्री. सरमद शरद पाटील यांनी महाराणा प्रताप यांचा हा पुतळा साकारला आहे.

८ ऑगस्ट २०१९ रोजी हा पुतळा मुंबईत आणण्यात आला. २० फूट उंचीच्या चौथ-यावर, १६ फूट उंचीचा हा भव्य पुतळा स्थापित करण्यात आला आहे. साडेचार टन वजनी आणि कांस्याने बनविलेला हा पुतळा भालाधारी व अश्वारूढ आहे. पुतळा उभारताना संपूर्ण चौकाचे नावीन्यपूर्ण पद्धतीने सुशोभीकरण देखील करण्यात आले आहे. या ठिकाणी चौकाला शोभेल अशी आकर्षक विद्युत रोशणाई देखील करण्यात आली आहे. वाहतूक बेटाच्या सुशोभीकरणाचे काम सुरू असताना बेस्ट बसस्थानकाजवळील एका बेटावर जुने कारंजे आढळून आले. त्याचा जीर्णोद्धार करून सुशोभीकरण करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT