Milind Narvekar
Milind Narvekar sarkarnama
मुंबई

Shiv Sena : उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर मिलिंद नार्वेकर गेले कुठे ?

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेना, शिंदे गट आणि भाजपमधले राजकारण पेटत असतानाच मातोश्री अर्थात, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) भोवती रवी म्हात्रे फिरत राहिले आणि ठाकरेंचे विश्वासू, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) चर्चेच्या फेऱ्यात आले.

नव्या राजकारणात ‘म्हात्रे इन आणि नार्वेकर आऊट' इतपत निकष काढून नव्या वादाला तोंड फोडले गेले ; पण उद्धव आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचा खास आदेश घेऊन नार्वेकर गुरुवारी दुपारीच तिरुपतीला निघून गेले. (Milind Narvekar latest news)

शिवसेनेच्या वर्तुळात गोंधळ उडत असतानाही ठाकरेंनी नार्वेकरांना नेमका कोणता आदेश दिला, यावरून तर्कवितर्क लावले जात आहेत. परिणामी, शिवसेना फुटली, ठाकरे सरकार पडले, शिंदे सरकार आले, शिंदे-नार्वेकरांच्या भेटी झाल्या, शिंदे सरकारात नार्वेकर दिसणार, या चर्चा होऊनही पक्ष संघटना, मातोश्री आणि ठाकरे यांच्याकडे नार्वेकरांचे स्थान कायम असल्याचेच दिसत आहेत.

शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नार्वेकरांची दोनदा त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यावरून नार्वेकर फुटणार असल्याच्या चर्चा रंगल्या. त्यानंतरही नार्वेकर हे मातोश्रीवरच राहिले. पण कॅमेऱ्यापुढे येणे टाळले. त्यापलीकडे बाजू मांडण्याचाही प्रयत्न केला नाही. परंतु, शिवसेना-शिंदे गटातील संघर्षात नार्वेकर ठाकरेंची बाजू भक्कम ठेवत होते. परंतु, या लढ्यात नार्वेकर उघडपणे दिसत नसल्याकडे बोट दाखविले गेले.

दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी गोरेगावात घेतलेल्या पक्षाच्या मेळाव्यात ठाकरेंभोवती रवी म्हात्रे दिसले. हातात फायली घेतलेले म्हात्रे सक्रिय झाल्याने ते नार्वेकरांची जागा घेणार असल्याचे सांगण्यात आले.

म्हात्रे हे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वीय सहायक होते. त्या काळात ते सक्रीय होते. पुढे मात्र, ते पूर्णपणे संघटनेपासून लांब होते. आता अचानकच म्हात्रे ठाकरेंसोबत दिसले होते. त्यावरूनही राजकीय वर्तुळात नार्वेकरांबाबत उलटसुलट चर्चा झाल्या. त्यातही नार्वेकर हे मातोश्री आणि शिवसेनेतील नियमित कामात होते. या काळात ठाकरेंची महत्त्वाची कामे, रुटीन बैठका, शिवसेना भवनातील आढावा, इतर पक्षांतील नेत्यांचे प्रवेशांत नार्वेकर बिझी होते.

नवी मुंबईत तिरुमला तिरुपती देवस्थानला दिलेल्या जागेबाबतच्या बैठकीसाठी नार्वेकर तिरुपतीला गेले. त्याआधी गुरुवारी सकाळीच मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शिवसेनेतील बंडानंतर नेहमीच केंद्रस्थानी येणारे नार्वेकर शिंदेंच्या बंडानेही चर्चेत आले.

अलीकडे तर नार्वेकर हे शिंदे सरकारमध्ये मंत्री राहणार असल्याचे सांगण्यात येते होते. त्याला या दोघांच्या भेटीचे संदर्भही जोडले जात होते. या वादावर नार्वेकरांनी एकदाही आपली भूमिका मांडली नाही.

याआधी केंद्रीय मंत्री नारायण राणे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतरही एकदाही नार्वेकर बोलले नाहीत. त्यावरून त्यांच्याबाबत उलटसुलट चर्चा होत्या. मात्र, काहीही न बोलता तिरुमला तिरुपती देवस्थानच्या बैठकांना उपस्थित राहून नवी मुंबईत देवस्थानला दिलेल्या जागेबाबत देवस्थानचे अध्यक्ष सुब्बारेड्डी यांच्यासोबत चर्चा केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT