Uddhav Thackeray News : Sarkarnama
मुंबई

Thackeray-Shinde Politics: ठाकरेंची तोफ ठाण्यात धडाडणार; शिंदेंच्या आरोपांची परतफेड करणार

Uddhav Thackeray News : इर्शाळवाडी दुर्घटना घडली आणि उद्धव ठाकरेंनी तो कार्यक्रम रद्द केला.

सरकारनामा ब्यूरो

Uddhav Thackeray News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना अधिवेशनात शुक्रवारी बऱ्याच मुद्द्यांवरून डिवचले आणि शिंदे-फडणवीस- पवार सरकारचा कारभार ठाकरे सरकारपेक्षा उजवा असल्याचे जाहीर केले. अशातच, मुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्यात शनिवारी ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. या दौऱ्यात ठाकरे हे उत्तर भारतीयांशी संवाद साधणार असले तरी ते शिंदेच्याच दिशेने आपले बाण सोडणार असल्याचे निश्चित आहे. परिणामी, उद्या ठाण्यात राजकीय आखाडा रंगू शकतो.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचा ठाण्यात उत्तर भारतीय आणि हिंदी भाषिकांचा मेळावा होणार आहे. ठाण्यातील गडकरी रंगतायन या ठिकाणी सायंकाळी सात वाजता उद्धव ठाकरे हिंदी भाषिकांना मार्गदर्शन करणार आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गेल्या आठवड्यातच ठाण्यात हिंदी भाषिकांचा मेळावा घेणार होते. पण त्याच दिवशी इर्शाळवाडी दुर्घटना घडली आणि उद्धव ठाकरेंनी तो कार्यक्रम रद्द केला. इर्शाळवाडी दुर्घटनेला १० दिवस झाल्यानंतर ठाकरेंनी पुन्हा एकदा हिंदी भाषिकांना साद घातली आहे. हिंदी भाषिकांच्या या मेळाव्यातून हिंदी भाषिकांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करणार आहेत.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार शिंदे -फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. बैठका, मेळावे,दौऱ्यांसह इन्कमिंग, आऊटगोईंग सारख्या राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. त्यातच राज्यातील सत्तासंघर्षानंतर शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के दिले जात आहेत. पण आता उद्धव ठाकरेंनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळेच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात आरोपांच्या फैरी झडण्याची शक्यता आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT