Uddhav Thackeray : मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पडली आहे. त्यामुळे पक्षाला सावरण्यासाठी आदित्य ठाकरे यांचे दौरे राज्यभरात सुरु आहेत. त्यातच आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हेही राज्याच्या दौर्यावर जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या दौऱ्याची सुरुवात उद्धव ठाकरे पोहरादेवी येथून करण्याची शक्यता आहे.
मागील काही निवडणुकीत शिवसेनेच्या पाठिशी असणारा बंजारा समाज दुरावू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पोहरादेवीमध्ये उद्धव ठाकरे धर्मगुरु बाबुसिंग महाराज, महंतांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि मंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे मोठे शक्तीप्रदर्शन केले आहे.
संजय राठोड हे उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. मात्र, पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. भाजपने या प्रकरणी आरोप केले होते. त्यानंतर शिंदे गट आणि भाजपने स्थापन केलेल्या सरकारमध्ये राठोड पुन्हा मंत्री झाले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यासाठी बंजारा समाजाने मोर्चा काढला होता. तसेच पोहरादेवी येथील महंतांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.
शिवसेनेतील फुटीनंतर पक्षाला पुन्हा उभारणी देण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच राज्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दरम्यान, पोहरादेवीला ते भेट देणार असल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनेचे मुंबईतील काही पदाधिकारी पोहरादेवीला दाखल झाले आहे.
पोहरादेवीच्या दर्शननंतर उद्धव ठाकरे हे रामराव महाराज स्मृतीस्थळ, संत सेवालाल महाराज, जगदंबा देवीचे दर्शन घेणार आहेत. बंजारा समाज शिवसेनेशी दूर जाऊ नये म्हणून स्वतः उद्धव ठाकरे पोहरादेवीत येणार असल्याची चर्चा आहे. पोहरादेवीचे मंदिर वाशिम जिल्ह्यात आहे. या ठिकाणाला बंजारा समाजाची काशी असे म्हटले जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.