Uddhav thackeray Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray : ''महाराष्ट्रात निष्ठेच्या पांघरूणाखाली जे लांडगे...''; ठाकरेंची शिंदे गटावर बोचरी टीका

Thackeray & Shinde News : लवकरच आपण ठाण्यात भव्य सभा घेणार असल्याची ठाकरेंची घोषणा...

सरकारनामा ब्यूरो

Thane Political News : शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ला असणाऱ्या ठाणे दौऱ्यावर आले आहेत. यावेळी ठाकरे गटाकडून शिंदे गटाला आव्हान देत मोठं शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. या दौऱ्यावेळी ठाकरेंनी शिंदे गटावर जोरदार हल्ला चढविला आहे.

ठाकरे गटाचे नेते व ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्याकडून शहरात आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिराचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला. तसेच लवकरच आपण ठाण्यात भव्य सभा घेणार असल्याची घोषणाही केली.

ठाकरे म्हणाले, संजय राऊत नुकतेच राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी काश्मीरला गेले होते. तिथून परतल्यावर त्यांनी मला व्हिडीओ दाखवला. यावेळी तिथेही ५० खोके एकदम ओके यांसारख्या घोषणा दिल्या जात असल्याचं पाहायला मिळालं. देशभरात सगळीकडे या घोषणेची चर्चा झाली. महाराष्ट्रात निष्ठेच्या पांघरूणाखाली जे लांडगे घुसले होते, ते विकले गेले. त्यातून महाराष्ट्राची आणि शिवसेनेचीही बदनामी झाली आहे असंही उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) या कार्यक्रमात बोलताना सांगितलं.

सध्या राजकारणात विकृत आणि गलिच्छपणा सुरू असतानाही शिवसेना मात्र आपल्या मूळ हेतूपासून दूर गेलेली नाही, याचा मला अभिमान आहे. अन्यायावर लाथ मारा, हे शिवसेनेचं ब्रीदवाक्य आहेच. पण त्यासोबतच ८० टक्के समाजसेवा आणि २० टक्के राजकारण हे आपल्याला शिवसेनाप्रमुखांनी शिकवलं आहे. अस्सल आणि निष्ठावंत शिवसैनिक या व्यासपीठावर आहेत आणि बाकीचे जे विकाऊ होते ते विकले गेले. काय भावाने विकले गेले ते आपल्या सगळ्यांना माहीतच आहे, मी ते सांगण्याची गरज नाही अशा शब्दांत ठाकरेंनी शिंदेंवर बोचरी टीका केली आहे.

आनंद दिघेंच्या पुतळ्याला उद्धव ठाकरेंकडून अभिवादन

शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर पहिल्यांदाच उध्दव ठाकरे हे ठाण्यात दाखल झाले आहे. यावेळी त्यांनी टेंभी नाका भागात जाऊन आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं. यावेळी त्यांच्यासोबत राजन विचारे तर होतेच शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडही उपस्थित होते. मात्र, यावेळी ठाकरेंनी दिघेंच्या आनंदाश्रम या ठिकाणी जाण्याचं टाळलं. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT