Mumbai News, 07 Dec : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांसह त्यांच्या कुटुंबीयांना दिल्लीतील ट्रिब्यूनल कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. कोर्टाने आयकर विभागाला जित पवारांची जप्त केलेली मालमत्ता मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर पार्थ पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी सबंधित मालमत्ताही कोर्टाने मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.
महत्वाची बाब म्हणजे राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांना दुसऱ्याच दिवशी मोठा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवारांना दिलेल्या या 'क्लीन चीट'वरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे. तर यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी एक्स या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये त्या म्हणतात, "अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि आयकर खात्याने त्यांची जप्त केलेली मालमत्ता परत केली. अजित पवारांनी लोकशाहीच्या बळटीकरणासाठी मोठ्या कष्टाने जो लढा दिला होता, त्या लढ्याला आता एका अर्थाने यश प्राप्त झाले आहे.
हा लोकशाहीच्या बळटीकरणाचा लढा याआधी राहुल कनाल, यशवंत जाधव, रवींद्र वायकर राहुल कनालसह काही चित्रविचित्र लोकांनीसुद्धा मोठ्या हिमतीने लढला होता. सन्माननीय अजितदादांना आणि त्यांच्यासारख्या लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी खडतर वाट चालणाऱ्या शूरवीरांचे अभिनंदन तसेच हा प्रवास यशस्वी करण्यासाठी मदत करणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे आभार."
आयकर विभागाने ऑक्टोबर 2021 मध्ये अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या बेनामी मालकीच्या काही मालमत्तेचा कथित संबंध असलेली काही कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. मात्र, या कारवाईनंतर अजित पवारांनी प्रतिक्रिया देताना आपण आयकरासंबंधी सर्व नियमांचे पालन केल्याचा दावा केला होता.
आम्ही नियमित टॅक्स भरतो, कुठलाही कर चुकवेगिरीपणा केलेला नाही, असे म्हणत अजित पवारांनी न्यायालयात दाद मागितली होती. अखेर दिल्ली ट्रिब्युनल कोर्टाने आयकर विभागाला जप्त संपत्ती मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.