CM Shinde, Devendra Fadnavis, Amit Shah, Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

CM Shinde and Fadnavis meet Amit Shah : शाह-शिंदे-फडणवीसांची ४५ मिनिटं चर्चा; राजकीय उलथापालथ होणार ?

Ganesh Thombare

Mumbai News: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबईत आले, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सोबतीला घेत लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. दर्शन आटपून थेट सागर बंगला गाठला अन् राजकीय खलबतांना प्रारंभ झाला.

शिंदे, फडणवीसांबरोबर शाहांनी बंद खोलीत नव्या-जुन्या राजकीय घडामोडी जाणून घेत शिंदे-फडणवीसांचा वर्ग घेतला. पण गंभीर म्हणजे शाहांच्या मुंबई दौऱ्यापासून ते 'सागर'वरील बैठकीपर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार लांब असल्याचे दिसून आले.

शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कान उपटल्यानंतर नार्वेकर दिल्ली दौऱ्यावर जाऊन आले. त्यांनी दिल्लीत कायदेशीर सल्ला घेतल्याचे सांगितले जाते.

असे असतानाच आता शनिवारी मुंबईत आलेल्या अमित शाहांनी शिंदे-फडणवीसांची तब्बल ४५ मिनिटे बंद दाराआड बैठक घेतली; पण या बैठकीला अजितदादा दिसले नाहीत. त्यामुळे अजितदादांना सोडून शाहांनी शिंदे-फडणवीसांना काय कानमंत्र दिला, याबाबत आता उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.

शिंदे-फडणवीसांबरोबरच्या या बैठकीतील खबर शाहांनी कानोकान बाहेर पडू दिली नाही. त्यामुळे या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, ही माहिती बाहेर येऊ शकली नाही. पण महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिकांच्या निवडणुका, तसेच १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील प्रकरणावर या बैठकीत खलबतं झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

याबरोबरच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देशही शाहांनी या बैठकीत दिले असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता भाजप आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काय रणनीती आखतं, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT