MNS Chief Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

...तर राज ठाकरेंना बेड्या ठोका

Raj Thackeray|MNS: वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शिवाजी पार्क येथील गुढीपाडव्या निमित्त झालेल्या मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मदरसे आणि मशीदींमध्ये समाज विघातक गोष्टी घडत आहेत असा अतिशय गंभीर आरोप केलेला आहे. महाराष्ट्र पोलिसांनी राज ठाकरे यांचे स्त्रोत तपासून ज्या मशिदीत अथवा मदरशांमध्ये समाजविघातक कृत्य घडत आहेत तेथे कसुन चौकशी करावी व काही तथ्य आढळल्यास मशिदी सील करुन जबाबदार मशिद व मदरसा समितीवर कडक कायदेशीर कारवाई करावी. मात्र, जर या वक्तव्यामध्ये काहीही तथ्य आढळून आले नाही तर समाजामध्ये दहशत व विद्वेष पसरविण्याच्या आरोपाखाली राज ठाकरे यांच्यावर यु ए पी ए अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांनी बेड्या ठोका, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aghadi) प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी केली आहे.

शनिवारी (ता. 2 एप्रिल) शिवाजी पार्कवर झालेल्या गुडीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी आक्रमक भाषण करत शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आदी नेत्यांवर निशाणा साधला. शिवाय राज यांनी हिंदुत्वाचा मुद्दा जोरकसपणे मांडत मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा समोर केला आणि जर मशिदींवरचे भोंगे खाली उतरवले नाही, तर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा, असा आदेशच मनसे कार्यकर्त्यांना दिला होता. यावर ठाकरे थांबले नाहीत तर मदरशांमध्ये समाजविघातक कृत्य घडत आहेत तेथे पोलिसांनी चौकशी करावी, अशीही टीका राज यांनी केली. त्यांच्या या वक्तव्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जोरदार टीका होत असतांना वंचितकडूनही त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला जात आहे.

काल सुजात आंबेडकर यांनी मशिदींवरील भोंगा काढण्यास अमित ठाकरेंना पाठवा व त्यांना हनुमान चालिसा म्हणायला सांगा, असे थेट आव्हान करत राज ठाकरेंना डिवचले होते. तर आज वंचितच्या प्रदेशाध्यक्षांनी पुन्हा राज यांच्या आरोपांवरून त्यांना नवे आव्हान दिले आहे.

दरम्यान, राज ठाकरेंच्या कालच्या भाषणावर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून हल्लाबोल करण्यात येत आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही राज यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, आधी विकासाची ब्ल्यू प्रिंट आहे असं म्हणायचे आणि मशिदीसमोर भोंगे लावून लोकांना कामाला लावायचं. पण ते असा रोजगार देतील हे माहीत नव्हतं. उद्या काही झालं आणि ते जेलमध्ये गेले, की त्यांना कोण जाणार सोडवायला, हीच का ब्ल्यू प्रिंट, असा सवाल करत आव्हाडांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT