Tukaram Mote pass away sarkarnama
मुंबई

Tukaram Mote : मोटे कुटुंबासाठी काळी दिवाळी! न्यायाधीशांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; सांगलीतील देशिंग गावावर शोककळा

Tukaram Mote pass away : शेतात आग नेमकी कशामुळे लागली आहे, याचे कारण पाहण्यासाठी तुकाराम मोटे हे शेताकडे गेले होते. ते विद्युत वाहिनीचा धक्का बसून त्यांचा मृत्यू झाला.

Roshan More, संदिप पंडित

Tukaram Mote News : वसई येथे कार्यरत असलेले वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश तुकाराम पतंगराव मोटे (वय 43) यांचा सांगलीतील मूळ गावी शेतात विजेचा धक्का लागून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

दिवाळीच्या सुट्ट्या घालवण्यासाठी तुकाराम मोटे हे आपल्या सांगतील मूळ गाव गेले होते. त्यांच्या या आकस्मिक आणि दुर्दैवी निधनामुळे सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यासह संपूर्ण देशिंग गावावर शोककळा पसरली आहे. प्रतिकूल परिस्थितीशी लढा देत त्यांनी न्यायाधीश पदापर्यंत मारलेली मजल ही संपूर्ण सांगली जिल्ह्यासाठी अभिमानास्पद होती.

ते शनिवारी घरालगत असलेल्या शेतातील उसाच्या फडाला अचानक आग लागली होती. शेतात आग नेमकी कशामुळे लागली आहे, याचे कारण पाहण्यासाठी तुकाराम मोटे हे शेताकडे गेले होते. मात्र, शेतात जमिनीवर तुटून पडलेल्या 11 KV (केव्ही) हायटेंशन विद्युत वाहिनीचा त्यांना प्रचंड विजेचा धक्का बसला. हा झटका इतका भीषण होता की त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलं होतं यश तुकाराम मोटे यांनी लहानपणापासून अत्यंत बिकट आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत आपले शिक्षण पूर्ण केले होते. त्यांच्या कठोर परिश्रमाच्या जोरावर त्यांनी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश पदापर्यंत मजल मारली होती.

सध्या ते पालघर जिल्ह्यातील वसई न्यायालय येथे कार्यरत होते. त्यांच्या या अचानक जाण्याने मोटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच कवठे महांकाळ पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून, या प्रकरणी पुढील पोलीस तपास सुरू आहे.

SCROLL FOR NEXT