Vasai Murder Case Sarkarnama
मुंबई

Vasai Murder Case : वसई हत्या प्रकरणाला वेगळं वळण, युवतीच्या बहिणीचे पोलिसांवर गंभीर आरोप; म्हणाली, "10 दिवसांपूर्वी..."

Jagdish Patil

Vasai Murder Case Update : वसई शहरात प्रियकराने भररस्त्यात लोखंडी पान्याने वार करून प्रेयसीची हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. शिवाय आरोपी तरुणीची हत्या करत असताना तिथे उपस्थित लोकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही, यावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

बघ्याची भूमिका घेण्यापेक्षा आरोपीला थांबवलं असतं तर कदाचित आरतीचा जीव वाचला असता असं लोक म्हणत आहेत. एकीकडे घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या लोकांच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे मृत आरतीची बहीण सानिया यादवने पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे.

पोलिसांनी (Police) ही घटना गांभीर्याने घेतली असती आणि आरोपी रोहितवर कडक कारवाई केली असती तर माझी बहीण वाचली असती. दहा दिवसांपूर्वी आरोपीने आपल्या बहिणीला गंभीर मारहाण केली होती. यानंतर पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. मात्र पोलिसांनी आरोपीवर कठोर कारवाई न केल्याने हा अनर्थ ओढावल्याचं तिने म्हटलं.

मयत आरतीची बहीण म्हणाली, रोहित माझ्या बहिणीला सतत त्रास द्यायचा, मागील आठवड्यातच 8 जूनला सकाळी त्याने आरतीला गंभीर मारहाण केली. या वेळी त्याने तिचा मोबाइलही फोडला. या मारहाणीनंतर आम्ही शनिवारी रात्रीच पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी एव्हरशाइन पोलिस स्टेशनमध्ये आम्हाला बोलावलं.

रविवारी आम्ही पोलिस स्टेशनला गेलो आणि आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी रोहितलादेखील पोलिस स्टेशनमध्ये बोलावून घेतलं, मात्र, त्याच्यावर कोणतीही कडक कारवाई न करता केवळ पुन्हा असं करू नको सांगून त्याला सोडून दिलं.

...तर माझी बहीण वाचली असती

यानंतर आम्ही पोलिसांना आता पुढे काय होणार असं विचारलं असता, पोलिस म्हणाले, तुम्ही घरी जावा, आता तो तुम्हाला काहीही करणार नाही. पोलिसांनी पैसे घेऊन त्याला सोडून दिलं. शिवाय मोबाइल दुरुस्त करून घ्या, असं सांगून आम्हाला तिथून घरी पाठवलं.

यावेळी रोहित हेमला मारेल असं आरतीने पोलिसांना सांगितलं. तरीही पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केला आणि त्याला सोडून दिलं. पोलिसांनी त्याच दिवशी रोहितवर कठोर कारवाई केली असती तर माझी बहीण वाचली असती असं, मृत आरतीची बहीण म्हणाली.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तर राज्यात वारंवार महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे लोकांना कायद्याचा धाक राहिला आहे का नाही? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

तर या हत्या प्रकरणाबाबत पोलिस आयुक्तांना कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीला कठोर शिक्षा होईल, या दृष्टीने तपास करण्याचे निर्देश दिले असल्याचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT