Vertical feet in Shiv Pratishthan; Nitin Chowgule founded the new organization
Vertical feet in Shiv Pratishthan; Nitin Chowgule founded the new organization 
मुंबई

शिवप्रतिष्ठानमध्ये उभी फूट; नितीन चौगुले यांनी केली नव्या संघटनेची स्थापना

सरकारनामा ब्यूरो

सातारा : संभाजी भिडे गुरूजी यांच्या शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानमधून निलंबित केलेले कार्यवाहक नितीन चौगुले यांनी आज सांगलीत शिवभक्त व धारकऱ्यांचा मेळावा घेऊन श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदूस्थान या नावान वेगळी संघटना स्थापन केली आहे. त्यामुळे शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानमध्ये अखेर फूट पडली आहे. नवीन संघटना ही सामाजिक कार्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे नितीन चौगुले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

गेल्या काही महिन्यांपासून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संभाजी भिडे गुरुजी यांच्या संघटनेमध्ये गृहकलह सुरू आहे. यातून प्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांचे निलंबन झाले होते. कोणतेही कारण नसताना हे निलंबन झाल्याचा आरोप करत नितीन चौगुले यांनी राज्यातील धारकऱ्यांना ''चलो सांगली'' ची हाक देत आपली भूमिका स्पष्ट करण्याचं जाहीर केलं होतं.

त्यानुसारच सांगलीमध्ये आज डेक्कन याठिकाणी नितीन चौगुले समर्थक धारकऱ्यांसह शिवभक्तांचा मेळावा झाला. या मेळाव्यातून नितीन चौगुले यांनी शिवप्रतिष्ठान मधील काही व्यक्तींच्या मुळे आपल्यावर नाहक आरोप झाले. या मंडळींच्या मुळे भिडे गुरुजींच्या मनात आपल्या बद्दल गैरसमज पसरले आहेत, असं मत व्यक्त करत गुरुजींनी दिलेले विचार यापुढे घेऊन जाण्यासाठी आणि देशसेवा करण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संस्था स्थापन करत असल्याचे जाहीर केले. या संस्थेच्या माध्यमातून या पुढे आपलं कार्य सुरू राहील असं स्पष्ट केले आहे.

श्री. चौगुले म्हणाले, माझे संघटनेतून निलंबन झाल्यानंतर मी सहकार्यवाहक रावसाहेब देसाईंना निवेदन देऊन माझ्या निलंबनाचा खुलासा करावा, अशी मागणी केली होती. पण त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळे मी आज शिवभक्तांचा व धारकऱ्यांचा मेळावा घेऊन माझे मन मोकळे केले आहे. मी आज श्री. शिवप्रतिष्ठान युवा हिंदूस्थान या नावाने संघटना स्थापन केली आहे. ही संघटनना सामाजिक कार्यायासाठी असेल. सर्व धारकऱ्यांशी विचार करून मी हा निर्णय घेतलेला आहे.

आता यापुढे छत्रपतींसोबत जे मावळे होते, त्यांच्या प्रत्येकांच्या समाधीचा जिर्णोध्दार करण्याचे कार्य आम्ही आजपासून हाती घेतले आहे. संघटनेत तुम्हाला तुमची बाजू मांडण्याची संधी दिली नाही, या प्रश्नावर चौगुले म्हणाले, महाराष्ट्रात असे अनेकजण आहेत. त्यांना या संघटनेतून निलंबित केलेल्याचे कारण समजलेले नाही. शिवप्रतिष्ठानमध्ये काही कार्यकर्ते अवैध धंदे चालवत होते. त्यांना गुरूजींचे पाठबळ होते असे वाटते का, या वर चौगुले म्हणाले, भिडे गुरूजींनी कायमच धारकऱ्यांचे हित पाहिले. म्हणूनच ते त्यांच्या पाठीशी उभे असतात. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT