Uddhav Thackrey, Eaknath Shinde Sarakarnama
मुंबई

CM Eknath Shinde : बाळासाहेब, उद्धव ठाकरेंनी परराज्यांत जाऊन भाजपच्या पालख्या वाहिल्या नाहीत; शिंदेंवर सडकून टीका

Sachin Waghmare

Mumbai News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या काळात चार राज्यांत जाऊन भाजपचा प्रचार करणार आहेत. यावरून सर्वच स्तरातून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली जात आहे. यावरूनच शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून एकनाथ शिंदेंवर सडकून टीका केली आहे. बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे हे एनडीएत होते, पण त्यांनी इतर राज्यांत जाऊन भाजपच्या पालख्या वाहिल्या नाहीत; पण आज ही मंडळी महाराष्ट्राच्या आचार, विचार आणि संस्कृतीवर पाणी टाकून हे परप्रांतीय भाजपचा प्रचार करणार आहेत. त्यापेक्षा ते थेट भाजपत का जात नाहीत? असा सवालही या वेळी सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिंदे गट व ठाकरे गटाकडून एकमेकांवर आरोपाची एकही संधी सोडली जात नाही. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड व तेलंगणा या चार राज्यांतील निवडणुका भाजपने प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपला नुसता पाठिंबा न देता शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गट निवडणूक प्रचारार्थ उतरणार आहे. भाजपच्या प्रचारासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रिंगणात उतरणार आहेत, अशी माहिती लोकसभेतील शिंदे गटाचे गट नेते तथा खासदार राहुल शेवाळे यांनी दिली. त्यानंतर या शिंदे गटाच्या भूमिकेवर ठाकरे गटाकडून जोरात टीका आहे.

किर्तीकर, रामदास कदम वादामुळे त्रस्त

एकनाथ शिंदे यांच्या गटातील खासदार गजानन किर्तीकर आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी एकमेकांवर गद्दारीचे आरोप-प्रत्यारोप केले. या दोघांमधील भांडण टोकाला पोहोचले आहे. त्यामुळे त्रस्त झालेले मुख्यमंत्री शिंदे भाजपच्या प्रचाराला निघाले आहेत. यामुळे नकली आणि डुप्लिकेट शिवसेनेच्या प्रचारात राम उरला नाही, हे त्यांना समजलं हे बरंच झालं, अशा कठोर शब्दांत शिंदेंवर ठाकरे गटाने हल्लाबोल केला आहे.

१४ महापालिका निवडणुका घेण्यास टाळाटाळ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकारण ३१ डिसेंबरनंतर संपणार आहे. त्यामुळे त्यांची मनस्थिती ऐन दिवाळीत बिघडली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अशा अनेक टोळधाडी आल्या अन् नामशेष झाल्या. पण हेच लोक मुंबई, ठाण्यासह राज्यातील १४ महापालिका निवडणुका घ्यायला घाबरत आहेत. मुळात बाळासाहेब ठाकरेंची भूमिकाच त्यांना समजली नाही म्हणून ते भाजपच्या प्रचाराची धुणी धुण्यासाठी जात आहेत.

मुख्यमंत्री शिंदे अल्लाबक्षच्या भूमिकेत

प्रसिद्ध नाटककार राम गणेश गडकरी यांच्या 'एकच प्याला' या नाटकातील तळीरामानं जी दारुबाजांची संस्था निर्माण केली. त्यातील शास्त्रीबुवा आणि अल्लाबक्ष यांच्यातील वैचारिक वाद नशेमुळं उफाळून येतो, आणि एकमेकांची उलट बाजू घेऊन भांडतात. यातील अल्लाबक्षच्या भूमिकेत सध्या मुख्यमंत्री शिंदे वावरत आहेत. तसेच भाजपच्या ढोंगी हिंदुत्वाचा प्रचार करण्यासाठी ते जाणार असल्याचे चिमटे सामनातून काढण्यात आले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

SCROLL FOR NEXT