मुंबई : अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे मुस्लिम असल्याचा दावा केला जात आहे. खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी नोकरी मिळवल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणात आता समीर वानखेडे यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे धाव घेतली आहे. त्यामुळे वानखेडेंच्या जातीचा चेंडू आता आयोगाच्या कोर्टात गेला असला तरी ही पडताळणी महाराष्ट्र सरकारच करणार आहे.
वानखेडे यांनी दिल्लीत आज राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे कार्यालय गाठले. त्यांनी आयोगाचे अध्यक्ष विजय सांपला यांची भेट घेतली. वानखेडे यांनी त्यांच्याकडील कागदपत्रे आयोगासमोर सादर केली आहेत. माझ्याकडील कागदपत्रे मी आयोगासमोर सादर केली आहेत. माझ्या तक्रारीची खातरजमा लवकरच केली जाईल आणि त्यावर आयोगाचे अध्यक्ष उत्तर देतील, असे वानखेडे यांनी या भेटीनंतर सांगितले. याबाबत आयोगाचे सदस्य सुभाष रामनाथ पारधी म्हणाले की, वानखेडे यांनी आयोगाच्या अध्यक्षांना भेटून त्यांच्या विषय मांडला आहे. त्यांनी दिलेली कागदपत्रे आम्ही पाहू आणि त्यांची पडताळणी करू.
यानंतर बोलताना आयोगाचे अध्यक्ष विजय सांपला म्हणाले की, समीर वानखेडे यांनी आयोगाकडे सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी महाराष्ट्र सरकार करणार आहे. ही कागदपत्रे वैध आढळल्यास त्याआधारे त्यांच्यावर कुणीही कारवाई करू शकत नाही.
समीर वानखेडे यांच्या पहिल्या विवाहाचे प्रमाणपत्र म्हणजेच निकाहनामा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सार्वजनिक केला होता. तसेच लग्नावेळी ते मुस्लिम होते, असा दावाही त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर समीर वानखेडे यांनी नुकतीच राष्ट्रीय अनुसूचित आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांची भेट घेतली. त्यांनी हलदर यांच्याकडे एक अर्जही केला होता. यानंतर हलदर यांनी वानखेडे यांना लगेचच क्लिनचिट दिली होती. हलदर म्हणाले होते की, मी त्यांची तक्रार पाहिली आहे. मला वाटते की ते अनुसूचित जातीमधील असावेत. धर्मांतर केल्याचे सर्व आरोप वानखेडेंनी फेटाळून लावले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.