Vishal Phate with Piyush Goyal Sarkarnama
मुंबई

विशाल फटेचा खुद्द पीयूष गोयल यांनीच केला होता सन्मान

सोलापूर जिल्ह्यासह राज्यभरातील हजारो नागरिकांना कोट्यवधीचा गंडा घालणाऱ्या विशाल फटेचे रोज नवे कारनामे समोर येत आहेत.

सरकारनामा ब्युरो

पुणे : सोलापूर जिल्ह्यासह राज्यभरातील हजारो नागरिकांना कोट्यवधीचा गंडा घालणाऱ्या विशाल फटेचे (Vishal Phate) रोज नवे कारनामे समोर येत आहेत. शेअर बाजारात (Share Market) गुंतवणूक करण्याच्या नावाखाली त्याने अनेकांना लुटलं. स्टार्टअप (StartUp) च्या नावाखाली त्याने काही संस्थांनी फसवत पुरस्कार मिळवल्याचेही स्पष्ट झाले आहे. एक पुरस्कार तर त्याने थेट केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांच्या हस्ते स्वीकारला होता.

गोयल यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारतानाचा विशाल फटेचे छायाचित्र सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. दिल्लीत एका आलिशान हॉटेलमध्ये मागील वर्षीच नोव्हेंबर महिन्यात हा कार्यक्रम झाला होता. एका माध्यम समूहाचा राईज स्टार्टअप टू युनिकॉर्न या पुरस्कार सोहळ्यात फटेचा गोयल यांनी सन्मान केला होता. पायोनिअरींग इम्पॅक्ट ऑन इंडियन इंडस्ट्री-अल्गो ट्रेडिंग असं फटेला मिळालेल्या पुरस्काराचे नाव आहे.

विशालका कन्सल्टंट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक असं पद या पुरस्कारावर देण्यात आलं होतं. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर कटोर परिश्रम व समर्पणाचे फळ मिळाल्याची भावना फटे याने व्यक्त केली होती. या पुरस्कार सोहळ्याचा व्हिडीओ गोयल यांनी त्याचदिवशी ट्विटही केला आहे. या युट्यूब लिंकमध्ये 43 व्या मिनिटाला विशाल फटे गोयल यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना दिसत आहे.

दरम्यान, सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील शेकडो नागरिकांना गंडा घालून पसार झालेल्या विशाल फटे याने पोलिसांची मात्र झोप उडवली आहे. फटेच्या फसवणुकीचा प्रताप केवळ बार्शी तालुक्यापुरता मर्यादी राहिला नसून इतर तालुक्यांसह राज्यभरातील लोकांच्या तक्रारी आता येऊ लागल्या आहेत. आतापर्यंत ७६ जणांनी तक्रार दिली असून फसवुणकीचा आकडा १८ ते १९ कोटींच्या घरात गेला आहे. मात्र, त्याने राज्यभरात अनेकांना गंडविल्याने सुमारे ५०० कोटी रुपयांपर्यंतची फसवणूक झाल्याची चर्चा आहे. विशाले फटे यांनी जादा परताव्याच्या अमिषाने राज्यातील इतर जिल्ह्यांत कमिशन एजंट नेमून पैसे गोळा केले असल्याचे समोर येत आहे.

शेकडो नागरिकांनी रोख रक्कम आणून विशाल फटेच्या ताब्यात दिली आहे. तो या रक्कम मोजण्यास वेळ घालवत नव्हता, तशीच कपाटात ठेवत असे, असे आज अनेक जण सांगत आहेत. पुण्याच्या खराडीत कार्यालय उघडून तेथे एकाला कामाला ठेवून कोट्यवधींचे व्यवहार केले आहेत, तर वाघोली (पुणे) येथील फसवणूक झालेले नागरिकही पोलिसांच्या संपर्कात आले आहेत. चाळीसगाव, कोल्हापूर, कर्नाटकमधील निपाणी येथीलही नागरिकांना त्याने गंडवले आहे. त्यांचीही तक्रार पोलिसांकडे दाखल झाली आहे.

शेअर मार्केटच्या नुसत्याच थापा...

विशाल फटे याने तीन वित्तीय संस्था स्थापन करुन शेअर मार्केटचा व्यवहार करतो, अशी थाप मारत पैसे घेऊन फसवले आहे. प्रत्यक्षात त्याने कोणाचेही शेअर मार्केटमध्ये खातेही उघडले नाही. स्वतःच्या खात्यावरुन व्यवहार करीत असे. सामान्य नागरिकांना, व्यापाऱ्यांना बँका पाच लाख किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम काढायची असेल तर पूर्वसूचना द्या, असे सांगतात पण फटे याने एकाच दिवसात पन्नास लाख ते एक कोटी रुपयांपर्यतची रक्कम काढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT