NCP News : Ajit pawar
NCP News : Ajit pawar  Sarkarnama
मुंबई

NCP News : 'अजितदादा जेव्हा पहिल्यांदा निवडून आले तेव्हा श्रीकांत शिंदे डायपरमध्ये..' ; राष्ट्रवादीच्या नेत्याची बोचरी टीका !

राहुल क्षीरसागर

NCP News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर टीका केली होती. "काकाच्या जीवावर अजितदादा मोठे झाले, त्यांना कोण ओळखतं?" असे डॉ. श्रीकांत शिंदेंनी टीका केली. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी खासदार आनंद परांजपे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

आनंद परांजपे म्हणाले,'श्रीकांत शिंदे यांचा जन्म १९८७ साली झाला. त्यांच्या जन्माच्या आधीपासून अजितदादा सार्वजनिक जीवनात सक्रीय आहेत. श्रीकांत शिंदे ज्यावेळेस डायपरमध्ये रांगत असतील, तेव्हा म्हणजे १९९१ साली अजितदादा खासदार झाले होते. तेव्हापासून त्यांनी आपली स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केलेली आहे. पण, ज्यांची स्वतःची ओळख ही खोक्यांपासून सुरू होऊन वडील, पक्षचिन्ह आणि पक्षच चोरण्याचे झाली आहे. त्यांनी अजितदादांशी आपली तुलना आणि त्यांच्यावर टीका करू नये."

परांजपे पुढे म्हणाले, "राजकीय क्षेत्रातील वरिष्ठ व्यक्तींबाबत श्रीकांत शिंदे नेहमी एकेरीच उल्लेख करत असतात. त्यावरून  त्यांचे  संस्कार आणि संस्कृती नेहमीच दिसून येत असते. त्यामुळे त्यांच्याकडून काही अपेक्षाच नाही. परंतु, अजितदादांवर टीका करताना त्यांनी तारतम्य पाळावे."

"मुख्यमंत्र्यांना सगळा देश ओळखतो. त्यांचे बरोबर आहे, एकनाथ शिंदे यांना सुरत, गुवाहाटी आणि गोव्यात चांगला प्रतिसाद मिळालाच होता ना? ३३ देश त्यांना ओळखतात पण, ती ओळख काय आहे, हे श्रीकांत शिंदे यांनी विचार करावा. कर्नाटकात मुख्यमंत्री शिंदे यांना पहायला गर्दी होते, असेही श्रीकांत शिंदे म्हणाले. तेही बरोबरच आहे."

कारण, तेथील लोक बघायला येतात की, महाराष्ट्रातील असा कोणता "हुशार मुख्यमंत्री" आहे की जो महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा पंतप्रधान असा उल्लेख करतो आणि एमपीएससीचा प्रश्न निवडणूक आयोगात नेतो, हे बघायला कर्नाटकातील लोक जाहीर सभेला येत असेल. राहिली गोष्ट राज्यातील तर मुंबई आणि खेडच्या सभेत आणलेली माणसे भाषणे ऐकायला का थांबली नाहीत, हे तथाकथित लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या मुलाने सांगावे," असेही परांजपे म्हणाले.

"शेतकऱ्यांचा मुलगा मुख्यमंत्री झालेला धनदांडग्यांच्या पचनी पडत नाही, असेही विधान त्यांनी केले आहे. पण, महाराष्ट्रातील शेतकरी अवकाळीच्या संकटात आहेत. त्यांचे पंचनामे झालेले नाहीत, शासकीय मदत मिळालेली नाही, अशा स्थितीत मुख्यमंत्री शिंदे प्रचारासाठी फिरत आहेत, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे," असे परांजपे म्हणाले.

"उद्या सर्वोच्च न्यायालयात निकाल लागणार आहे. त्यामुळे कर्नाटकात प्रचारासाठी फिरणाऱ्या एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांची अवस्था अमित शाहा आम्हाला वाचवा, असे म्हणत आहेत. त्यामुळे आपली राजकीय, सामाजिक आणि वैचारिक उंची आधी तपासून घ्यावी आणि नंतर अजित पवार (Ajit Pawar) या्ंच्यावर टीका करावी," असेही आनंद परांजपे यावेळी म्हणाले.

(Edited BY - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT