Atul Londhe, Param bir Singh & Vaze
Atul Londhe, Param bir Singh & Vaze Sarkarnama
मुंबई

परमबिरसिंह आणि सचिन वाझेंच्या भेटीमागे नेमके कोण?

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीरसिंह (Param bir Singh)सचिन वाझे (Sachin Waze) हे चांदिवाल कमिशनसमोर (Chandiwal Committee) चौकशीला जाण्यापूर्वी भेटले अशी माहिती मिळत आहे. हे नियमाला धरुन नाही. चौकशीला जाणारे दोन व्यक्ती वा आरोपी अशा प्रकारे भेटू शकत नाहीत, अशी नियमावली आहे. मग अशा परिस्थितीत ते दोघे का भेटले? कशासाठी भेटले? याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (Congress) कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी केली आहे.

लोंढे म्हणाले की, परमवीरसिंह व सचिन वाझे हे दोघेही अनेक प्रकरणात आरोपी आहेत. अशा पद्धीतीने दोन आरोपीमध्ये चर्चा होणे गंभीर आहे, यामुळे चौकशीमध्ये बाधा पोहचू शकते. महाराष्ट्रामध्ये अशी घटना कधी घडली नाही. जर असे झाले असेल तर, याची खोलात जाऊन चौकशी झाली पाहिजे. सिंग आणि वाझे यांच्यामध्ये काय चर्चा झाली? त्यांच्या भेटीमागे कोण आहे? त्यात काय कट शिजला? हे जनतेच्यासमोर आले पाहिजे, असे लोंढे म्हणाले आहे.

दरम्यान, परमबीरसिंह हे गृहरक्षक दलाचे महासंचालक आहेत. आज (ता.29 नोव्हेंबर) पहिल्यांदाच ते दक्षिण मुंबईतील होमगार्ड ऑफिसमध्ये आले. रजेवरुन परतल्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारलेला नाही. मात्र, ते त्यांच्या कक्षात गेले होते. दरम्यान, चांदीवाल समितीचे कार्यालय याच इमारतीत दुसऱ्या मजल्यावर आहे, तर गृहरक्षक कार्यालयाचे कार्यालय हे पहिल्या मजल्यावर आहे. समितीसमोर हजर राहण्यापूर्वी आज परमबीरसिंह आणि वाझे एकमेकांसमोर आले. त्यावेळी या दोघांमध्ये काही काळ संवाद झाला. मात्र, त्यांच्यात नेमके काय बोलणे झाले ते कळू शकले नाही. तब्बल आठ महिन्यांनंतर परमबीरसिंह आणि वाझे समोरासमोर आले होते.

यानंतर सिंह हे आज 11 वाजता चौकशीसाठी समितीसमोर हजर झाले. ते आज पहिल्यांदाच चौकशी समितीसमोर हजर झाले. त्यावेळी त्यांनी त्यांच्या वकिलामार्फत प्रतिज्ञापत्र सादर केले. समितीसमोर सादर करण्यास माझ्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. तसेच, कुठल्या साक्षीदाराची उलटतपासणीही मला करायची नाही, असे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. यामुळे परमबीरसिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपातून अधिकृतरीत्या माघार घेतल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. यामुळे अप्रत्यक्षपणे देशमुखांना क्लिनचिटच मिळाली, अशी चर्चा सुरू झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT