Ashish Shelar
Ashish Shelar Sarkarnama
मुंबई

BMC Scam News : पालिकेतील घोटाळ्याचा सूत्रधार कोण? 'एसआयटी' चौकशी करा; शेलारांचा निशाणा कुणावर?

सरकारनामा ब्युरो

BJP Attacks on Thackeray : मुंबई महानगरपालिकेतील नऊ विभागांतील कोविडसंबंधित व्यवहार वगळून 'कॅग'ने चौकशी केली आहे. त्या अहवालात पालिकेत आठ हजार ४८५ कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे नमूद केले आहे. त्यातील ठळक मुद्दे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात वाचून दाखविले होते. तसेच या प्रकरणी योग्य यंत्रणेद्वारे आणखी चौकशी करून कारवाईचा इशाराही त्यांनी दिलेला आहे. त्यानंतर आज महापालिकेतील घोटाळ्याचा सूत्रधार उघड होणे गरजेचे आहे. त्यासाठी या घोटाळ्याच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्याची मागणी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

'कॅग'चा अहवाल हा केवळ २८ नोव्हेंबर २०१९ ते ३१ आक्टोबर २०२२ या कालावधीतील आहे. त्यातही महापालिकेने नकार दिल्याने 'कोविड'च्या कामांचा समावेश केलेला नाही. पालिकेच्या नऊ विभागातील फक्त ७६ कामांमध्ये आठ हजार ४८५ कोटींचा हा घोटाळा उघड झाला आहे. त्यामुळे या प्रकरणी 'एसआयटी' स्थापन करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आमदार ॲड. शेलार यांनी केलेली आहे.

आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले, "पालिकेत आठ हजार ४८५ कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. 'कॅग'ने केलेल्या चौकशीमध्ये ते उघड झाले आहे. त्यामुळे या मागचा खरा सूत्रधार कोण हे उघड होणे आवश्यक आहे. त्यासाठी या सर्व कामांची फौजदारी कलमांतर्गत 'एसआयटी' मार्फत चौकशी करावी."

यानंतर शेलार यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली ते म्हणाले, "ज्या मुंबई महापालिकेचे नेतृत्व उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) करीत होते, त्याचे 'कट, कमिशन आणि कसाई' असे वर्णन करता येईल. त्यांनी मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकला आहे."

चार कंपन्या सांगून एकाच कंपनीला टेंडर दिल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. शेलार म्हणाले, "पालिकेतील कामे टेंडरविना दिली. टेंडरपेक्षा जास्त काम दिली. टेंडर पडताळणी केली नाही. अपात्र असलेल्यांना कामे दिली. काही ठिकाणी चार कंपन्या सांगून टेंडर दिले पण ती एकच कंपनी आहे. हा टेंडर अटी शर्तीचा भंग आहे. टेंडरमध्ये फेरफार आहे. कुठल्याच सरकारमध्ये झाला नसेल, इतका मोठा हा घोटाळा आहे. सॅपमध्ये टेंडर फेरफार झाला आहे. त्यात कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT