Ashish Shelar Sarkarnama
मुंबई

Nanar Refinery Project : कोकणातील रिफायनरी प्रकल्प पाकिस्तानात?; आशिष शेलारांचा ठाकरे गटावर गंभीर आरोप

या प्रकल्पाच्या विरोधात आकांडतांडव करणारे ठाकरे गटाच्या नेत्यांना यातून काय मिळाले, याचे उत्तर देतील का?

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : तब्बल १० अब्ज डॉलर्स गुंतवणुकीचा कोकणातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प आता पाकिस्तानात जाणार असून सौदी अराम्कोने या तेल कंपनीने त्यासाठी ग्वादर शहराची निवड केल्याची बातमी एका दैनिकाने दिली आहे. त्यावरून भाजपचे आमदार तथा पक्षाचे मुंबई अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांनी ठाकरे गटाच्या नेत्यावर हल्लाबोल केला आहे. ‘उबाठा’ने या ‘रिफायनरी’ला विरोध करुन सरळ सरळ पाकिस्तानला मदत केली? असा सवालच त्यांनी केला आहे. (Will refinery project in Konkan go to Pakistan?; Ashish Shelar's serious allegations on Thackeray group)

सौदी अराम्को या कंपनीची तब्बल १० हजार अब्ज डॉलर गुंतवणूक असलेला रिफायनरी प्रकल्पासाठी कोकणाची (konkan) निवड करण्यात आली होती. प्रथमच नाणार येथे, त्यानंतर बारसू येथील जमीन त्यासाठी प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र, शिवसेनेच्या (Shivsena) प्रखर विरोधामुळे तो प्रकल्प मार्गी लागू शकलेला नाही. त्यातच तो प्रकल्प आता पाकिस्तानात जाणार असल्याची बातमी एका दैनिकाने दिली आहे.

आमदार शेलार (Ashish Shelar) यांनी याबाबत थेट शिवसेनेच्या ठाकरे गटाला जबाबदार धरले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, कोकणातील नाणार येथे होणारा देशातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प आपल्याला मिळावा; म्हणून पाकिस्तान प्रयत्न करीत आहे. या प्रकल्पात सर्वात मोठी गुंतवणूक असलेल्या ‘सौदी अराम्को’ या तेल कंपनीने आता पाकिस्तानातील ग्वादर शहराची निवड केली आहे. तब्बल १० अब्ज डॉलर्स गुंतवणुकीच्या सामंजस्य करारावर पाकिस्तान व सौदी अरेबियाने स्वाक्षरी केली आहे, अशी बातमी एका वर्तमानपत्रात आली आहे.

गेली सहा वर्षे नाणार येथे रिफायनरीला विरोध करणाऱ्या ठाकरे गटाच्या शिवसेनेने कोकण, महाराष्ट्र आणि देशाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केले?प्रकल्प भारताला मिळू नये; म्हणून ज्या आंतरराष्ट्रीय शक्ती काम करतात, त्या नाणार विरोधी आंदोलनात सहभागी तर नव्हत्या ना? देशविरोधी आंतरराष्ट्रीय शक्तींशी प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांची हातमिळवणी तर नव्हती? ‘उबाठा’ने नाणारला विरोध करुन सरळ सरळ पाकिस्तानला मदत केली का? असे सवाल शेलार यांनी उपस्थित केले आहेत.

नाणारमध्ये होणारा रिफायनरी प्रकल्प ग्रीन प्रोजेक्टच होता. तो प्रकल्प आता पाकिस्तानकडे जात आहे, अशा बातम्या येत आहेत. या प्रकल्पाच्या विरोधात आकांडतांडव करणारे ठाकरे गटाच्या नेत्यांना यातून काय मिळाले, याचे उत्तर देतील का. या प्रकल्पातून हजारो लोकांना रोजगार मिळणार होता. आता हा प्रकल्प पाकिस्तानकडे गेला तर काय मिळाले, असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला आहे.

आशिष शेलार म्हणाले की, सौदी अरेबिया पाकिस्तानकडे जाण्यासाठी नाणारमधील रिफायनरीच्या विरोधातील आंदोलन हे बळ देणारे झाले की नाही, असा प्रश्न जनतेच्या मनात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT