Wine  Sarkarnama
मुंबई

वाईन विक्रीवरून ठाकरे सरकार अडचणीत? वाद पोचला उच्च न्यायालयात

राज्य सरकारने वाईन (Wine) सुपरमार्केटमध्ये उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्य सरकारने वाईन (Wine) सुपरमार्केटमध्ये उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. याविरोधात भाजपसह (BJP) विरोधी पक्षांनी जोरदार मोहीम सुरू केली आहे. सरकारच्या या निर्णयावर टीकेची झोड उठत असताना आता अडचणीत आणखी वाढ झाली आहे. सरकारच्या या निर्णयाला उच्च न्यायालयात (High Court) आव्हान देण्यात आले आहे. यामुळे सरकारच्या या निर्णयाला 'ब्रेक' लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सामाजिक कार्यकर्ते संदीप कुसाळकर यांनी वाईन विक्रीच्या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली केली आहे. राज्य सरकारच्या दारू विक्रीवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशांना या निर्णयामुळे हरताळ फासला जात आहे. यापुढे सहजपणे लोकांना वाईन मिळू शकेल. वाईन ही हानिकारक आहे, असा दावा त्यांनी याचिकेत केला आहे. नशेखोर, अनाथ मुले आणि युवकांसाठी याचिकाकर्ते विविध प्रकारची कामे करतात. अशाप्रकारे वाईनची विक्री झाल्यास युवक आणि लहान मुले व्यसनाधीन होण्याची भीती आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारने मागील महिन्यात घेतलेल्या निर्णयानुसार शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळावे, यासाठी फळांची वाईन राज्यभरातील सुपरमार्केटमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे. मात्र, राज्य सरकारने 2011 मध्ये घेतलेल्या नशाबंदीच्या निर्णयाला यामुळे छेद जात आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. युवा पिढीला व्यसनापासून मुक्त करण्यासाठी सरकारने धोरण निश्चित केले होते. नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षा ही राज्य सरकारची जबाबदारी असूनही त्याचे उल्लंघन सरकारकडून होत आहे. तसेच, शाळा, महाविद्यालय, रुग्णालयांच्या परिसरात दारू विक्रीला मनाई आहे. सरकारच्या या निर्णयाने आधीच्या उद्देशाला पूर्णपणे हरताळ फासला गेला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारने वाईन उद्योगाला चालना देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. सुपर मार्केटमध्ये वाईन विकण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. एक हजार चौरस फूटापेक्षा मोठ्या दुकानांत शोकेस निर्माण करून वाईन विकता येईल. ही वाईन सध्या बार किंवा मद्याच्या दुकानांतच मिळते. ती आता सुपर मार्केटमध्येही मिळू शकेल. सरकारच्या या धोरणावर विरोधक तुटून पडले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT