Supriya Sule| Amit Shaha
Supriya Sule| Amit Shaha 
मुंबई

राष्ट्रवादीच्या आमदारांना झेड प्लस सुरक्षा पुरवावी; सुप्रिया सुळेंची थेट अमित शहांकडे मागणी

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्याच्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon Session) दरम्यान आज अभूतपूर्व गोंधळ झाल्याचे पााहायला मिळाले. पावसाळी अधिवेशनात गेली चार दिवस खोक्यांच्या घोषणाबाजीवरुन राजकारण (Politics) तापलं आहे. विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी शिंदे गटातील आमदार आणि विरोधी पक्षातील आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. घोषणाबाजी करत दोन्ही गट आक्रमक झाल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी तातडीने मध्यस्थी करुन हा गोंधळ थांबवण्याचा प्रयत्न केला.

या घटनेनंतर दोन्ही गटातील आमदारांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपही झाले. "आम्ही जे केले नाही ते आरोप विरोधकांनी केले. आम्ही बांगड्या भरल्या नाहीत, आमच्या अंगावर आले तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही," असे शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी सांगितले. शिंदे गटाच्या या भूमिकेनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत थेट केंद्रिय गृहमंत्री अमित शहांकडे या घटनेची तक्रार केली आहे.

''गृहमंत्री अमित शहा जी, शिंदे गटाचे आमदार महाराष्ट्र विधानभवनाच्या आवारात महाविकासा आघाडीच्या आमदारांबद्दल हिंसक विधाने करून त्यांना धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच, या आमदारांकडून महाविकास आघाडीच्या आमदारांच्या सुरक्षेला असलेला वाढता धोका पाहून तुमच्या भाजप पक्षासोबत युतीचे सरकार चालवणाऱ्या लोकांच्या या वृत्तीवर कारवाई करावी आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना झेड प्लस सुरक्षा द्यावी, असे ट्विट करत सुप्रिया सुळे यांनी आमदारांना सुरुक्षा पुरवण्याची विनंती आहे.

सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीशी असभ्य वर्तन केले आहे. महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी लवकरात लवकर चर्चा करावी आणि परिस्थिती पाहता शिंदे गटाच्या आमदारांना कायदा व लोकशाही मूल्ये शिकवावीत. असेही सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटमध्य़े लिहीले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT