vijay auti & nilesh lanke
vijay auti & nilesh lanke sarkarnama
नगर

शिवसेना-राष्ट्रवादीत रस्त्याच्या श्रेयावरून वाद पेटला

मार्तंड बुचुडे

पारनेर : राज्यात सर्वत्र महाविकास आघाडीचे वारे वाहत असताना पारनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्यातील दुरावा काही मिटताना दिसत नाही. पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील राष्ट्रीय महामार्ग ते हनुमान नगर मार्गचे काम प्रलंबित आहे. या कामावरून श्रेयवाद सुरू झाला आहे. Argument between Shiv Sena and NCP to get credit for road work

शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांनी त्यांच्या कार्यकाळात या रस्त्यासाठी निधी आणला होता. मात्र राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी रस्त्याचे काम जाणून बुजून प्रलंबित ठेवले असा शिवसेनेचा आरोप आहे. तर आमदार लंके यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. या रस्त्याच्या कामापेक्षा पारनेर तालुक्यात या श्रेयवादाच्या राजकारणावरून राजकीय चर्चेला उधाण आले आहे. आमदार लंके हे लोकसभा निवडणुकीपर्यंत शिवसेनेत होते.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून मंजुर झालेल्या रस्त्यांच्या कामांना आपल्या काळात मंजुरी मिळाली होती. त्यासाठी आपण पाठपुरावा केला होता. आता त्या कामांसाठी निधी मंजुर झाल्याने या कामाचे श्रेय आपलेच आहे. त्यामुळे या कामांचे भूमिपूजन करण्याचा अधिकार आपलाच असल्याचा दावा करून विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांनी विविध कामांचे भूमिपूजन करीत "या कामांमध्ये कोणी खोडा घातला तर आपण सर्वांचे बाप आहोत" असा इशारा दिला होता. औटी यांनी कामांचे भूमिपूजन केले खरे, मात्र दोन महिने उलटले तरी त्यांचे कामच सुरू झाले नव्हते. त्यामुळे काशिनाथ दाते व विकास रोहोकले यांनी कामे सुरू न झाल्यास उपोषणाचा इशारा दिला होता. त्यावर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यकारी अभियंत्यांनी काही कामे सुरू झाली असून काही कामे आठ दिवसांत सुरू करण्यात येणार असल्याचे आश्‍वा सन दिले होते.

विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांनी पाठपुरावा करून राज्य सरकार मार्फत एशियन डेव्हलपमेंट बँक यांच्या अर्थसहाय्याने 11 कोटी 91 लाख निधीतील पारनेर तालुक्यातील महत्त्वाचे रस्ते मार्ग मंजुरीनंतरही ते कामे सुरू करण्यात आले नाहीत याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रव्यवहार करताच या कामांना सुरवात करण्यात आली, अशी माहिती जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते, सभापती गणेश शेळके,तालुकाप्रमुख विकास रोहकले यांनी दिली.

दाते म्हणाले, तालुक्यातील जामगाव ते सारोळा आडवाई, राष्ट्रीय महामार्ग ते धोत्रे खुर्द, जामगाव ते साठे वस्ती- लोणी हवेली, राष्ट्रीय महामार्ग ते हनुमान नगर (भाळवणी) मावळेवाडी - गावठे वस्ती (वाडेगव्हाण)अस्तगाव- आमले वस्ती या रस्त्यांना 11 कोटी 91 लाख रुपये निधीची कामे राज्य सरकारने एशियन डेव्हलपमेंट बँकेचे अर्थसहाय्याने मंजुर केली होती.

या कामासाठी विजय औटी यांनी प्रयत्न केले होते व त्यांचेच शिफारशीनुसार शासनाने ती मंजुर केलेली होती. या कामांना मंजुर होऊन दोन महिने कालावधी नंतरही ती कामे सुरू करण्यात आली नाहीत आम्ही सातत्याने याकरीता पाठपुरावा करत होतो मात्र संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत होता याबाबत प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता यांना (ता.27) रोजी पत्रव्यवहार करून कार्यालयात उपोषण करण्याचा इशारा दिला व ही माहिती पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आली याची तात्काळ दखल घेत ही कामे सुरू करण्यात आली आहेत, असे दाते यांनी सांगितले.

विकास रोहकले म्हणाले, तालुक्यातील रस्त्यांसाठी औटी यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर याकरिता निधी उपलब्ध झाला होता मात्र कामे सुरू करण्यात आली नव्हती आम्ही उपोषणाचा इशारा व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्रव्यवहार केल्यानंतर तात्काळ हे कामे सुरू करण्यात आली तालुक्यातील कामे सुरू झाल्याने समाधान वाटते असे शिवसेनेचे तालुकाप्रमुख विकास रोहकले यांनी सांगितले.

शिवसेनेच्या या आरोपाला आमदार लंके यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. आमदार लंके म्हणाले, कोणत्याही कामाचे भूमिपूजन शासकीय प्रोटोकॉलप्रमाणे करावे लागले. त्यावेळी सबंधित खात्याचे अधिकारी, ठेकेदार उपस्थित असावे लागतात. उद्या कोणीही उठेल व भूमिपूजन करेल आणि काम सुरू झाले नाही म्हणून उपोषणाचा इशारा देईल. याला काहीच किंमत नाही. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून मंजुर झालेल्या कामांचे भूमिपूजन शासकीय प्रोटोकॉलप्रमाणे, मंत्र्यांच्या उपस्थितीत होईल व त्यानंतरच कामे सुरू होतील. सध्या रस्त्याच्या बाजूच्या झाडांची साफसफार्ई सुरू आहे. त्याला काम सुरू झाले असे कसे म्हणता येईल ?

मी काम मंजुर केल्याचा कोणीही दावा केला तरी त्याला निधी कोणाच्या काळात मंजुर झाला ? अर्थमंत्री कोण आहे ? याची माहिती विरोधकांनी घ्यावी. शासकीय प्रोटोकॉलप्रमाणे संबंधित लोकप्रतिनिधी, त्या खात्याचे अधिकारी, ठेकेदार त्यावेळी उपस्थित असणे बंधनकारक असते, असे काहीही नसताना स्वतःच नारळ फोडून कोणी स्वतःची पाठ थोपटून घेणार असेल तर तालुक्यातील जनता दुधखुळी नाही याची जाणीव ठेवा, असा टोलाही आमदार लंके यांनी लगावला.

हा दावा हस्यास्पद

या रस्त्यांच्या भूमिपूजनासाठी मंत्री येणार आहेत. प्रोटोकॉलप्रमाणे त्यांच्या स्वागताची तयारी सुरू झालेली असताना काम सुरू झाल्याचा दावा करणे हास्यास्पद असल्याचे आमदार लंके म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT