Bhausaheb wakchoure , Eaknath shinde  Sarkarnama
नगर

Bhausaheb wakchoure : माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे शेती, वीजप्रश्नी आक्रमक; मुख्यमंत्री शिंदेंकडे केली तक्रार

Bhausaheb Vakchoure Agriculture, Power Problem Aggressive: शेती वीज ग्राहकांना यामुळे नाहक अतिरिक्त वीजबिल भरणा करावा लागत असल्याने माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे संतप्त झाले आहेत.

Sachin Waghmare

राजेंद्र त्रिमुखे

Bhausaheb wakchoure : ग्रामीण भागात शेतकऱ्यांना शेती करताना अनंत अडचणींना सामोरे जावे लागते. यात वीज नियमित आणि सुरळीत पुरवठा हा मोठा प्रश्न असून, शेती वीज ग्राहकांना यामुळे नाहक अतिरिक्त वीजबिल भरणा करावा लागत असल्याने शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे संतप्त झाले आहेत. याबाबत त्यांनी जिल्ह्यातील विस्कळीत वीजपुरवठा आणि गैरवाजवी वीजबिलाची तक्रार थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

उत्तर नगर जिल्ह्यातील धरणातील नदी आणि पाटांनी वाहणारे पाणी ही मोठी देणगी असली तरी विजेचा लपंडाव, रात्रीची वीज, त्यामुळे श्वापदांची भीती, बिघडलेले ट्रान्सफॉर्मर बदलण्यासाठी करावी लागणारी स्थानिकांना वर्गणी, भारनियमन असे वीज वितरणचे वाभाडेच भाऊसाहेब वाकचौरे यांनी काढले असून, यात तातडीने सुधारणा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

याबाबतचे लेखी पत्र वाकचौरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वीज वितरणच्या कार्यकारी संचालकांना पाठवले आहे. खरिपात पडलेला अत्यल्प पाऊस आणि त्यामुळे रब्बीचे पीक धोक्यात असताना पाटपाण्याद्वारे मिळणारे पाणीही विजेअभावी वाया जाणार असेल, तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवावा लागेल, असे वाकचौरे यांनी स्पष्ट केले आहे.

नगर-नाशिक जिल्ह्यांतील धरण समूहातून पाच टीएमसी पाणी जायकवाडीला सोडले जाणार आहे. जलसंपदाच्या या आदेशाला न्यायालयात आव्हान दिले गेले असून, या प्रश्नावरून नगर-नाशिक विरुद्ध मराठवाडा असा संघर्ष समोर येत आहे. अशात खरीप वाया गेल्याने आणि रब्बीला केवळ धरणातील पाण्यांवर नगर जिल्ह्यातील शेतकरी अवलंबून असताना खंडित आणि आणि केवळ रात्रीचा वीजपुरवठा, ट्रान्सफॉर्मर बिघाड आदी कारणे समोर येत असल्याने वाकचौरे संतप्त झाले आहेत.

शेतकरी वर्गावर होतोय अन्याय

खंडित वीजपुरवठ्यासोबतच वीज देयकामधे व्याजाची आकारणी ही २२ टक्के होत असल्याने शेतकरी वर्गावर होणारा, मोठा अन्याय, वीज देयकातील इतर अकारणीमुळे वीज देयकाची रक्कम मोठ्या प्रमाणात वाढणे यावर वाकचौरे यांनी आक्षेप घेतला असून, या तफावती दूर करण्याची मागणी केली आहे.

शेतकऱ्यांना प्रत्यक्षात फक्त 6 ते 8 तास वीजपुरवठा

शेतकऱ्यास प्रत्यक्षात फक्त 6 ते 8 तास वीज पुरविली जाते. मात्र, विजेच्या देयकाची आकारणी ही 24 तांसाची केली जाते. त्या मुळे शेतकरी जेवढी वीज वापरतो किंवा बीज पुरवली जाते. तेवढेच विजेचे देयक शेतकरी यास मिळणे आवश्यक असल्याचे वाकचौरे यांनी म्हटले आहे. ग्रामीण भागात जंगली श्वापद यांचा वावर आसल्याने शेतकऱ्यांवर हल्ले झाल्याचे प्रकार घडलेले आहेत. त्यामुळे भीतीपोटी रात्रीचे वेळी शेतीला पाणी देता येत नाही. ही वस्तुस्थिती असून, शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा केला जावा आणि शेती वीजवाहिनी नादुरुस्त झाल्यास त्याची देखभाल दुरुस्तीसाठी त्या वाहिनीवरील शेतकरी वर्गाला वर्गणी गोळा करावी लागते, ही अनिष्ट प्रथा बंद होऊन वीज वितरण कंपनीमार्फत दुरुस्ती केली जावी, अशा मागण्या भाऊसाहेब वाकचौरे यांनी केल्या आहेत.

SCROLL FOR NEXT