Chat with Yashwantrao Gadakh's colorful peers throughout the year
Chat with Yashwantrao Gadakh's colorful peers throughout the year sarkarnama
नगर

वर्षभरांनी यशवंतराव गडाख यांच्या रंगल्या सवंगड्यांशी गप्पा : घेतला भाजीभाकरीचा अस्वाद

विनायक दरंदले

सोनई (अहमदनगर) : सुमारे दीड वर्षांपासून राज्यात कोरोना विषाणूंनी थैमान मांडले आहे. शाळा ( school ), महाविद्यालये (college ), धार्मिक स्थळे ( Religious places ) बंद आहेत. मोठे समारंभ, धार्मिक कार्यक्रमांतील उपस्थितांच्या संख्येवर प्रशासनाने मर्यादा आणली आहे. प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात कोरोना लसीकरण करण्यात आल्याने कोरोनाचा धोका थोडा कमी झाला आहे. त्यामुळे आता नातेवाईक, सवंगडी यांच्या गठीभेटी सुरू झाल्या आहे.

कोरोना आजारानंतर एक वर्षापासून रुग्णालय व घरातील चार भिंतीच्या आत पुस्तकालाच आपला मित्र समजून वाचनात मग्न झालेले जेष्ठ नेते व माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी मुळा कारखान्यावर अचानक भेट दिली. नेवासे तालुक्यातील अनेक मित्रांशी चावडीवरच्या गप्पा मारल्या. अंगतपंगत करत भाजीभाकरीचा आस्वाद घेतला. एक वर्षानंतर झालेली ही भेट आज जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

मागील वर्षी गडाख यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु असताना नेवासे तालुक्यात सर्व धर्मिय कार्यकर्त्यांनी आपआपल्या गावातील देवतांना त्यांच्या आरोग्यासाठी साकडे घातले होते. आजारातून बरे होवून नगरच्या घरी येवूनही त्यांना कुणाला भेटता येत नव्हते. मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर यांनी गडाखांना भ्रमणध्वनी करुन भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी मीच येतो कारखान्यावर सर्वांना निरोप दे असे सांगितले.

दोन दिवसापूर्वी जेष्ठ नेते गडाख कारखान्यावर आले आणि झाडाखाली खुर्ची टाकून बसले. सर्व संचालकासह माजी उपाध्यक्ष जबाजी फाटके बाळासाहेब शेरकर, कडुबाळ कर्डिले व सर्व जेष्ठ मित्रांची मैफल रंगली.मागील महिन्यात झालेला पाऊस, धरणाची स्थिती, कोरोनामुळे अर्थकारणावर झालेला परिणाम, नवीन गळीत हंगामाचा आढावा घेतला. कोरोनामुळे गोरगरिबांवर मोठे संकट आले असुन त्यांना घासातला घास देणे आवश्यक आहे. असे त्यांनी सांगितले.

माका (ता.नेवासे) चे सरपंच नाथा घुले यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त गडाख यांच्या हस्ते माका विद्यालयास एक लाख रुपयांचे पुस्तक भेट दिले. युवक कार्यकर्ते अनिल घुले बरोबर त्यांनी मनमुराद गप्पा मारल्या. दोन तास चावडीवरच्या गप्पा झाल्या नंतर सर्व उपस्थितांनी एकत्र मेथीची भाजी, ठेचा, वरणभात जेवणाची अंगत-पंगत केली. अनेक जेष्ठांची गळाभेट घेवून गडाखांनी सर्वांचा निरोप घेतला. दोन तासांची ही भेट खरोखर सर्वांसाठी मोठा आनंद सोहळा ठरला असे तुवर यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT