Congress State President Balasaheb Thorat
Congress State President Balasaheb Thorat 
नगर

'ईडी'च्या पीडेची घराघरांत चर्चा : बाळासाहेब थोरात

सरकारनामा ब्युरो

संगमनेर (नगर) : "सत्तारूढ महायुतीने पाच वर्षांत राज्याला घातक वळणावर नेल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उदाहरणावरून सिद्ध झाले आहे. निकोप लोकशाहीच्या रक्षणासाठीही त्यांच्याविरुद्ध बोलणारा 'राष्ट्रद्रोही' ठरविला जातो,'' असे सांगताना, कोणालाही माहीत नसलेल्या 'ईडी'ची पीडा राज्यातील प्रत्येक घरात चर्चेच्या रूपाने पोचली, अशा शब्दांत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत सरकारवर टीका केली.

थोरात म्हणाले, "शरद पवारांसारख्या सर्वसमावेशक, राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करणाऱ्या ज्येष्ठ नेत्याला यात गुंतविण्याचा त्यांचा प्रयत्न फसला आहे. मात्र, त्यांच्या या कृतीचा राज्यातील सर्वसामान्यांनी रस्त्यावर उतरून केलेला निषेध निश्‍चितच स्वागतार्ह आहे. स्वतः 'ईडी'च्या कार्यालयात जाण्यापासून पवारांना प्रशासनाने विनंती करून रोखले असले, तरी त्यांनी 'दिल्लीच्या तख्तापुढे महाराष्ट्र झुकणार नाही' हा मराठी बाणा दाखवून दिला आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, लोकशाहीला घातक असलेल्या या निंदनीय प्रकाराचा निषेध जनता मतांतून नोंदविणार आहे.''

भाजपमध्ये गेल्यानंतर माणसे शुद्ध होऊन त्यांचे अपराध गळून पडतात. त्यांच्या भ्रष्टाचाराची चर्चा व तक्रारही होत नाही, हे सर्वांना समजले आहे, अशी कोपरखळी मारून, "राज्यातील जनता व आम्ही अशा निर्णयांच्या विरोधात ठामपणे उभे राहू,''असे थोरात यांनी स्पष्ट केले. मित्रपक्षांसाठी जागा देण्यात अडचण होणार असल्याने, जागावाटप पुढे ढकलले असून, निवडणूक प्रचारासाठी आवश्‍यकतेप्रमाणे प्रियांका गांधी, राहुल गांधी व सोनिया गांधी महाराष्ट्रात येणार असल्याचेही थोरात यांनी सांगितले.

'त्यांचा स्वतःचाच नाकर्तेपणा सिद्ध'
गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी, 'कॉंग्रेसमध्ये आत्मा राहिला नाही,' अशी खिल्ली उडवली होती. यावर थोरात म्हणाले, "वास्तविक, विखे यांनी साडेचार वर्षे राज्याचे नेतृत्व केले होते. त्यांनी हा आरोप करणे म्हणजे स्वतःचाच नाकर्तेपणा सिद्ध करणे आहे. कॉंग्रेस अशा पद्धतीने मृतप्राय होणार नाही. उलट, या निवडणुकीत भरारी घेणार आहे." शिर्डी विधानसभा मतदारसंघात विखेंच्या विरोधात सक्षम उमेदवार देणार असल्याचे सांगत, आमचा कोणताही उमेदवार शिवसेना- भाजपच्या वाटेवर नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT