Bjp Vs Balasahebanchi Shivsena
Bjp Vs Balasahebanchi Shivsena Sarkarnama
नगर

Bjp Vs Balasahebanchi Shivsena: नगरमध्ये भाजप- शिंदे गटात तुफान राडा; पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

सरकारनामा ब्यूरो

Ahmednagar News : राज्यात भाजप आणि शिंदे गट सत्तेत एकत्र आहे. मात्र,स्थानिक पातळीवर भाजप आणि शिंदेगटातला संघर्ष लपून राहिलेला नाही. ग्रामपंचायत निवडणुकीपासून ते विविध मुद्द्यांवर या दोन्ही पक्षांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत राजकीय वातावरण तापलेलंही पाहायला मिळालं आहे. आता अहमदनगरमध्ये भाजप (Bjp) आणि शिंदे गटात तुफान राडा झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

अहमदनगरमधील केडगावमध्ये कर्डिले गट आणि सातपुते गट आमने-सामने आल्याची धक्कादायक घटना घडली. मेहकरी (ता. नगर) येथील एका विवाह सोहळ्यात मंगळवारी रात्री किरकोळ कारणातून भाजप व शिंदे गटाच्या(Balasahebanchi Shivsena) दोन युवा नेत्यांमध्ये बाचाबाची झाली. यानंतर केडगावमधील हॉटेल रंगोलीवर सात ते आठ चारचाकी वाहनातून आलेल्या जमावाने दगडफेक केली. यामुळे केडगावमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

यावेळी दोन्ही गटाकडून तुफान दगडफेक करण्यात आली आहे. यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. परंतू घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक अनिल कातकाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, कोतवालीचे निरीक्षक संपत शिंदे यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत केडगावसह नगर शहरात तणावपूर्ण परिस्थिती होती. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती समोर येत आहे.

काय आहे प्रकरण?

नगरमधील मेहकरी गावात विवाहप्रसंगी भाजप नेते, माजी आमदार शिवाजी कर्डीले(Shivaji Kardile)यांचे चिरंजीव अक्षय कर्डीले व बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नगर शहरप्रमुख, माजी नगरसेवक दिलीप सातपुते यांचे चिरंजीव ओंकार सातपुते यांच्यात वाद झाला. त्यानंतर कर्डीले गटाच्या समर्थकांनी केडगावामध्ये येत हॉटेल रंगोलीवर दगडफेक केली. तास सातपुते गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रतिउत्तर दिले. दोन्ही गटाकडून दगडफेक करण्यात आली आहे.

या घटनेनंतर रस्तारोको करण्यात आला. यादरम्यान पुन्हा दगडफेक झाली असून रस्त्याने जाणाऱ्या वाहनांचे नुकसान करण्यात आलं आहे. दगडफेक झाल्यामुळे केडगावमध्ये तणावाचं वातावरण असून पोलिसांचा बंदोबस्त केडगावमध्ये तैनात करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT