Nagar News : रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करत ते काम बंद पाडण्याचा प्रकार नगर जिल्ह्यात घडला आहे. एवढेच नाही तर या निकृष्ट कामाविरोधात सोमवारी रास्ता आंदोलनदेखील केले जाणार आहे. ही घटना घडली आहे श्रीगोंदामधील ढवळगावात.
भाजप आमदार बबनराव पाचपुते (Babanrao Pachpute) यांनी मंजूर केलेल्या रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याचा ग्रामस्थांनी आक्षेप घेतला. त्यानंतर काम निकृष्ट होत असल्याचे पाहून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राहुल जगताप (Rahul Jagtap) यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला.
श्रीगोंद्यातील घारगाव-पिंपळगाव मार्गे ढवळगाव रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप घारगावचे सरपंच रमेश खोमणे यांनी केला आहे. या आरोपाची दखल घेत माजी आमदार राहुल जगताप यांनी रस्त्याची पाहणी केली. यावर रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याचे निदर्शनास आल्यावर राहुल जगताप चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विजय होके यांना फोनवरून फैलावर घेतले. यावेळी त्यांच्याबरोबर ग्रामस्थ होते. रस्त्याचे काम चांगले व्हावे यासाठी राहुल जगताप आणि ग्रामस्थांनी काम बंद पाडले.
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या घारगाव पिंपळगांवमार्गे ढवळगाव रस्त्याच्या कामासाठी भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांनी दोन टप्प्यांत पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता. या निधी मंजूर होताच रस्त्याचे काम सुरू झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे कामासाठी ठेकेदार नेमला. या ठेकेदाराने उपठेकेदार नेमून रस्त्याचे काम सुरू केले. या रस्त्याच्या कामासाठी काळ्या मातीचा वापर केला जात आहे. हा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात आल्यावर त्यांनी ठेकेदाराविरोधात तक्रारी सुरू केल्या. परंतु ठेकेदाराने तक्रारींकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर आक्रमक ग्रामस्थांनी रस्त्याचे काम बंद पाडले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
ग्रामस्थांनी माजी आमदार राहुल जगताप यांच्याकडेही तक्रार केली. त्यानंतर राहुल जगतापांनी रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी धाव घेतली. रस्त्यावर टाकलेल्या खडीवर पुरेसे डांबर नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. तसेच रस्ता उखडल्याचे लक्षात आले. रस्त्यावरील खडी गोळा झाली होती. हा प्रकार पाहून सरपंच रमेश खोमणे हे देखील संतप्त झाले. ग्रामस्थांनी या निकृष्ट कामावर संताप व्यक्त केला.
राहुल जगताप यांनी उपअभियंता विजय होके यांना तातडीने संपर्क साधून तक्रार केली. कामात सुधारणा करा, नाहीतर गंभीर परिणामांना समोरे जावे लागेल, असा इशारा दिला. तसेच रस्त्याचे काम दर्जेदार होण्याच्या मागणीसाठी सोमवारी रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशाराही राहुल जगातप यांनी दिला. यावेळी सुनील कळमकर, शरद कळमकर, राजाराम महाडिक, राहुल कळमकर, संदीप थिटे उपस्थित होते.
(Edited by Avinash Chandane)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.