Indorikar maharaj.jpg
Indorikar maharaj.jpg 
नगर

इंदोरीकर महाराजांच्या खटल्यावर आता 20 ऑगस्टला सुनावणी

आनंद गायकवाड
संगमनेर: अपत्याबाबत वादग्रस्त विधान केल्याने समाजप्रबोधनकार निवृत्ती देशमुख इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आज त्याबाबत न्यायालयात सुनावणी झाली. आता पुढील सुनावणी ता. 20 आॅगस्टला होणार असल्याची माहिती त्यांचे वकील के.डी. धुमाळ यांनी दिली.

अपत्यप्राप्तीच्या संदर्भात कीर्तनातून केलेल्य़ा वादग्रस्त वक्तव्यामुळे समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर अडचणीत सापडले होते. त्यांच्या विरोधात प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान कायदा 'पीसीपीएनडीटी' कायद्यांतर्गत संगमनेरच्या प्रथमवर्ग न्यायालयात खटला दाखल झाला होता. त्यांच्या विरोधातील आज असलेल्या सुनावणीला त्यांनी वकीलामार्फत जिल्हा सत्र न्यायालयात अपिल दाखल केल्याने स्थगिती मिळाली आहे.पुढील सुनावणी गुरुवारी होणार आहे.

संबंधित विधानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात घुलेवाडीच्या ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर भवर यांनी गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यान्वये 19 जून रोजी संगमनेर न्यायालयात खटला दाखल केला होता. त्यानुसार 3 जुलै रोजी संगमनेरचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. डी. कोळेकर यांच्यासमोर कामकाज झाले होते. या वेळी सरकारी वकील अ‍ॅड. लिना चव्हाण यांनी सरकारची बाजू मांडली होती. तसेच या संदर्भात महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या बुवाबाजी संघर्ष विभागाच्या सचिव अ‍ॅड. रंजना पगार-गवांदे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे पुराव्यानिशी तक्रार केली होती. या तक्रारीनुसार जिल्हा शल्यचिकित्सांनी खटला दाखल करण्याचे आदेश दिले होते. आजच्या आदेशाने 20 ऑगस्ट पर्य़ंत इंदोरीकर महाराजांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ राज्यभरातील वारकरी सांप्रदायातील महाराजांनी आंदोलने केली होती. अनेक राजकीय नेत्यांनी महाराजांना पाठिंबा दिला होता. या खटल्याकडे आता महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदायाचे लक्ष लागले आहे.

Edited By - Murlidhar K

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT