नगर

उत्तरेतील नेत्यांनी दक्षिणेकडील लुडबूड थांबवावी; डाॅ. विखे यांच्यावर अॅड. ढाकणे गरजले 

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून कोण उमेदवारी करणार, याबाबत तर्कवितर्क लावले जात असतानाच त्यादृष्टीने एकमेकांवर आरोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे कोण चेहरे इच्छुक आहेत, याबाबत तर्क लावले जात आहेत. डाॅ. सुजय विखे पाटील यांनी या मतदारसंघासाठी उमेदवारीचे सुतोवाच केले असल्याने त्यांनी जोरदार जनसंपर्क सुरू केला आहे. आता अॅड. प्रताप ढाकणे यांचेही दक्षिणेवरील प्रेम उफाळून आले असून, जिल्हा विभाजनाच्या मुद्द्यावर त्यांनी डाॅ. विखे यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे.

मुरलीधर कराळे

नगर : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून कोण उमेदवारी करणार, याबाबत तर्कवितर्क लावले जात असतानाच त्यादृष्टीने एकमेकांवर आरोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे कोण चेहरे इच्छुक आहेत, याबाबत तर्क लावले जात आहेत. डाॅ. सुजय विखे पाटील यांनी या मतदारसंघासाठी उमेदवारीचे सुतोवाच केले असल्याने त्यांनी जोरदार जनसंपर्क सुरू केला आहे. आता अॅड. प्रताप ढाकणे यांचेही दक्षिणेवरील प्रेम उफाळून आले असून, जिल्हा विभाजनाच्या मुद्द्यावर त्यांनी डाॅ. विखे यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे. त्यामुळे आगामी काळात या दोन युवा नेत्यांमध्ये संघर्षाची चिन्हे दिसून येऊ लागले आहेत.

डाॅ. विखेंवर गरजले अॅड. ढाकणे
काँग्रेसचे युवा नेते डाॅ. सुजय विखे यांनी जिल्हा विभाजनाची गरज नसल्याचे जामखेड येथील एका कार्यक्रमात सांगितले. १९८० पासून जिल्हा विभाजनाची मागणी असताना डाॅ. विखे यांनी केलेले हे वक्तव्य दक्षिणेतील नेत्यांच्या जिव्हारी लागले. याबाबत अॅड. प्रताप ढाकणे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका विषद केली.

ते म्हणाले, ''उत्तरेतील नेते दक्षिणेतील नेत्यांमध्ये भांडणे लावून स्वतःचा स्वार्थ साधून घेतात. दक्षिणेतील नेत्यांना त्यांच्या वेदना माहिती आहेत. उत्तरेतील नेत्यांनी इकडे डोकावून हे दुःख कमी होणार नाही, तर वाढणारच आहे. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी जिल्हा विभाजनाचा विषय तातडीने मंत्रीमंडळासमोर आणावा. दक्षिणेतील सर्वपक्षीय नेत्यांनी संघटित होऊन हा विषय मार्गी लावावा, अशी आपली भूमिका आहे. डाॅ. विखे हे राजकारणी नाहीत, तर ते भरकटलेले आहेत, असे त्यांनीच जाहीर केले आहे. त्यांच्या ओठावरचे दूधही अजून सुकले नाही, त्यांनी जिल्हा विभाजनाला विरोधाची भाषा करू नये," 

त्यांचे हॅलिकाॅप्टर भरकटलेले
दक्षिणेतील प्रत्येक गावातून हॅलिकाॅप्टरमधून प्रचार करण्याचे वक्तव्य डाॅ. विखे यांनी यापूर्वी केले होते. त्याचा संदर्भ घेऊन अॅड. ढाकणे यांनी डाॅ. विखे यांच्यावर टीका केली. हेलिकाॅप्टर उडविणाऱ्यांचे हॅलिकाॅप्टर भरकटलेले आहे. जनता काय असते हे त्यांना लवकरच कळेल, असा टोला अॅड. ढाकणे यांनी लगावला.

अॅड. ढाकणे यांचे भाजपप्रेम
पाथर्डी तालुक्यातील माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्या गाैरवाच्या निमित्ताने त्यांचे पूत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस अॅड. प्रताप ढाकणे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करून आपण आगामी निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे अप्रत्यक्ष जाहीर केले. या कार्यक्रमास भाजप व राष्ट्रवादी या दोन्ही डगरींवर हात ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, मात्र मुख्यमंत्री न आल्याने हा प्रयत्न फसल्याचे मानले जाते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही त्यांच्याविषयी विशेष उत्सुकता दाखविली नाही. त्यामुळे अॅड. ढाकणे यांच्या आगामी काळातील भूमिकेबाबत अनिश्चितता असल्याचे कार्यकर्त्यांना जाणवते. अशातच नुकतेच अॅड. ढाकणे यांनी जिल्हाविभाजनाच्या मुद्द्यावर भाजपचे पालमकमंत्री प्रा. राम शिंदे यांचे कौतुक करीत काँग्रेसचे डाॅ. सुजय विखे यांच्यावर टीका केली. जिल्हा विभाजन व्हावे, ही दक्षिणेतील नेत्यांची इच्छा असून, या नेत्यांनी एकत्र यावे, अशी भूमिका अॅड. ढाकणे यांनी जाहीर करून उत्तरेतील नेत्यांनी दक्षिणेकडील लुडबूड थांबावी, असा इशारा दिला. शिवाय पालकंत्री राम शिंदे यांची भूमिका रास्त असून, जिल्हा विभाजनप्रश्नी त्यांना दक्षिणेतील नेत्यांनी साथ देण्याची गरज त्यांनी विषद केल्यामुळे अॅड. ढाकणे यांचे भाजपप्रेम अजूनही कमी झाले नसल्याचे मानले जाते.

जनसेवा फाउंडेशन विरुद्ध शेतकरी फाउंडेशन
विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पूत्र व काँग्रेसचे युवा नेते डाॅ. सुजय विखे यांनी जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य शिबिरे घेऊन जनसंपर्क वाढविला आहे. तर पाथर्डी तालुक्यात अॅड. प्रताप ढाकणे यांनी त्यांचे पूत्र ऋषिकेश याला युवकांमध्ये पुढे केले आहे. शेतकरी फाउंडेशनची स्थापना करून ऋषिकेशला सक्रीय करण्यात आले आहे. त्यामुळे जनसेवा फाउंडेशन विरुद्ध शेतकरी फाउंडेशन असेच चित्र दक्षिणेतील तालुक्यांमधून दिसू लागले आहे. फाउंडेशनच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्यामागे राजकीय हेतू दडून राहत नाही. त्यामुळे फाउंडेशन हे राजकारणाचा अड्डा बनू पाहत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT