नगर

चारा छावणीसाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्याची आत्महत्या? प्रशासनाने जबाबदारी झटकली

सरकारनामा ब्युरो

नगर : बंद केलेल्या छावण्या सुरू करण्याच्या मागणीसाठी गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून घोसपुरी येथील शेतकरी वसंत सदाशिव झरेकर यांनी आज विष पिऊन आत्महत्या केली. झरेकर हे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. मात्र, छावणीच्या कारणासाठी ही आत्महत्या असल्याचा दावा प्रशासनाने फेटाळला आहे.

शिवसेनेच्या वतीने नगर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून आंदोलने सुरू आहेत. प्रारंभी नगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यानंतर नगर तहसील कार्यालयासमोर ठिय्या मांडून आंदोलन केले. याच वेळी सामुहिकपणे विषप्राषन करून आत्महत्या करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला होता. या आंदोलनात झरेकर सहभागी होते, असे समजते.

आज पहाटे झरेकर यांनी विषप्राषण करून आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आला. तेथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली. छावण्या सुरू करू न देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी. गुन्हा दाखल करावा, अन्यथा मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. हा मृतदेह घरी न नेता थेट जिल्हाधिकारी कार्यालयात नेला जाईल, असा इशारा जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी दिला आहे.

दरम्यान, जिल्हा शासकीय रुग्णालयात आंदोलक जमले असून मृतदेहाचे शवविच्छेदन करून देण्यास आंदोलकांनी नकार दिला आहे. यावेळी शिवसेनेचे नगर जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्याच प्रमाणे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, पंचायत समिती सदस्य रामदास भोर, बाळासाहेब हराळ यांनी  उपस्थित असलेल्या नगर तालुका तहसीलदार उमेश पाटील यांच्याशी चर्चा केली. संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केल्याशिवाय अंत्यविधी होणार नाही, अशी भूमिका कार्ले यांनी व्यक्त केली. दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील शवागृहासमोरच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला असून, सरकारविरोधी घोषणाबाजी सुरू केली आहे.

ही आत्महत्या छावणीसाठी नाही : तहसीलदार
संबंधित शेतकऱ्याची कोणतीही जनावरे छावणीत दाखल झालेली नव्हती. त्याच प्रमाणे घोसपुरी गावात अद्यापही छावणी सुरू असून, ही आत्महत्या छावणीच्या कारणासाठी केलेली नाही - उमेश पाटील, तहसीलदार

या आत्महत्येस प्रशासन जबाबदार नाही : प्रशांत पाटील
ही आत्महत्या छावणीसाठी नसून अन्य कारणांमुळे आहे. जिल्ह्यात गरज आणि मागणीनुसार जनावरांसाठी छावण्या सुरु असून,शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली, हा प्रचार चुकीचा आहे. या आत्महत्या प्रशासन जबाबदार नाही - प्रशांत पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT