नगर

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मातोश्री सिंधूताईंचे निधन

सरकारनामा ब्युरो

नगर : प्रियदर्शनी ग्रामीण महिला मंडळाच्या अध्यक्ष सिंधुताई एकनाथ विखे पाटील (वय ८४) यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. गृहराज्यमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या त्या मातुश्री होत. अशोक, राधाकृष्ण आणि राजेंद्र ही सिंधूताई यांची तीन मुले आहेत. प्रवरानगर येथे आज दुपारी सिंधूताई यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

सिंधूताई विखे पाटील यांचा जन्म १ आॅगस्ट १९३५ रोजी झाला. त्यांचे शिक्षण पाचवीपर्य़ंत होते. सामाजिक व राजकीय स्तरावर त्यांनी आपले कर्तृत्त्व सिद्ध केले. बाळासाहेब उर्फ एकनाथ विखे पाटील यांच्यासोबत विवाह झाल्यानंतर त्यांनी सामाजिक क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवला. त्यांनी १९८८ मध्ये प्रियदर्शनी ग्रामीण महिला मंडळाची स्थापना करून महिलांविषयक कामे केली. तसेच प्रियदर्शनी सार्वजनिक ग्रंथालय, वाचनालयाची स्थापना १९९० मध्ये केली. त्यामुळे युवकांना पुस्तकांचे दालन उभे राहिले. १९९२ मध्ये प्रियदर्शिनी ग्रामीण महिला बिगरशेती सहकारी पतसंस्थेची स्थापना करून विशेषतः महिलांना पतपुरवठा होण्यासाठी मोलाचे काम केले.

१९९७ मध्ये महिला शिवणकला प्रशिक्षण केंद्र, १९९८ मध्ये महला लघुउद्योग केंद्र, १९८९ मध्ये अद्वैत महिला भजनी मंडळ, तसेच प्रियदर्शनी कॅंटीन व जनरल स्टोअर उभारून महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी विशेष लक्ष दिले. १९९७ मध्ये लोणी बुद्रुक येथे बालवाडीची स्थापना करून बालकांना उच्च दर्जाचे शिक्षण कसे मिळेल, यासाठी लक्ष केंद्रीत केले. २००१ मध्ये गृहविज्ञान महिला महाविद्यालय, २००३ मध्ये बी. सी. ए. महिला महाविद्यालय, २००४ मध्ये पुणतांबा येथे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, २००६ मध्ये नामदेव परजणे पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, तसेच २००६ मध्ये प्रियदर्शनी ग्रामीण अध्यापक विद्यालय लोणी येथे त्यांच्याच संकल्पनेतून उभारले गेले.

महिलांमध्ये शैक्षणिक जनजागृती होण्यासाठी त्यांचा विशेष हट्ट असे. महिला बचत गट मेळावे, माता बालसंगोपन शिबिर, महिला आरोग्य शिबिर, मकर संक्रांतिनिमित्त हळदीकुंकू समारंभ, जागतिक महिला दिन असे विविध कार्यक्रम त्यांनी घेतले. या सर्व कामांमुळे सिंधूताई यांना आदर्श माता पुरस्कार, पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर पुरस्कार, मातोश्री रमाबाई आंबेडकर आदर्श महिला पुरस्कार, आदर्श गोपालक पुरस्कार, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT