nagawade karkhana.jpg
nagawade karkhana.jpg sarkarnama
नगर

'नागवडे उसाच्या वजनात काटा मारून कुटुंबातील व्यक्तींच्या नावे पैसे काढतात'

संजय आ काटे

श्रीगोंदे : श्रीगोंदे तालुक्यातील नागवडे साखर कारखान्याची निवडणूक जवळ आली आहे. या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. श्रीगोंद्यात काल (रविवारी) नागवडे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केशव मगर यांनी पत्रकार परिषद घेऊन राजेंद्र नागवडे यांच्यासह विद्यमान सत्ताधारी संचालकांवर जोरदार टीकेची झोड उठविली. या प्रसंगी कारखाना संचालक आण्णासाहेब शेलार, काँगेसचे तालुकाध्यक्ष दीपक भोसले, जिजाबापू शिंदे, संजय जामदार, प्रशांत दरेकर, अजित जामदार, ॲड. बाळासाहेब काकडे, ॲड. बापूसाहेब भोस, अनिल ठवाळ उपस्थित होते.

केशव मगर म्हणाले, मालकीची जमिनी नाही, उसाची नोंदही नसताना तेथून कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी मुले, नातेवाईक तसेच कर्मचाऱ्यांच्या नावाने बोगस ऊस कारखान्याला घातला आहे. खोट्या नोंदी दाखवून कोट्यवधी लाटले आहेत. मगर यांनी पुरावे समोर मांडत सांगितले की, राजेंद्र नागवडे हे शेतकऱ्यांच्या उसाच्या वजनात काटा मारून कुटुंबातील व्यक्तींच्या नावे पैसे काढतात.

पृथ्वीराज राजेंद्र नागवडे यांच्या नावे मांडवगण (ता. शिरूर) व दिग्विजय नागवडे यांच्या नावे वाळकी (ता. नगर) येथे जमीन नाही. मात्र, याच गावातून शेकडो टन ऊस आल्याचे दाखविण्यात येवून त्यापोटी लाखोंचे बोगस बिले कारखान्यातून काढली. अशीच बोगस बिले इतर नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांच्याही नावे बोगस ऊस दाखवित काढल्याचा पुरावा आहे. याचा प्रामाणिक खुलासा कारखाना अध्यक्षांनी करावा, असे मगर म्हणाले.

शेलार म्हणाले, राजेंद्र नागवडे हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. त्यांचे कुठेही खासगी कारखाने वा कंपन्या नाहीत. असा दावा त्यांनी केला होता. पुणे येथील श्री. लक्ष्मी नरसिंह शुगर, ग्रामलाईफ फार्मर प्रोड्युसर कंपनी, उमंग ऍग्रो गोल्ड, श्री लक्ष्मी नरसिंह स्पायनिंग, श्रीकांत ॲग्रोटेक इंडस्ट्रीज, हायक्यू व्हेनच्युअरस या सहा खासगी कंपन्यांपैकी पाच त्यांच्या पत्नी अनुराधा नागवडे यांच्या नावे तर एका कंपनीत खुद्द राजेंद्र नागवडे यांच्या नावावर आहे. त्यासाठी पैसा कोठून आला याचा शोध घेत आहोत, असा आरोपही शेलार यांनी केला.

विरोधक जुने आरोप पुन्हा करीत आहेत. काही वर्षांपूर्वी कर्जमाफी मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी त्यांचा ऊस दुसऱ्याच्या नावावर घालण्याचा आग्रह धरला होता. त्यात घोटाळा नाही संबधीत शेतकऱ्यांना ते पैसे दिले आहेत. ज्या कंपन्या आहेत त्यांचे केवळ रजिस्ट्रेशन केलेले आहे. त्या सुरू नाहीत. उगाच दिशाभूल करू नये.

- राजेंद्र नागवडे, अध्यक्ष नागवडे सहकारी साखर कारखाना.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT