नगर

रोहित पवारांमागे उभं राहिलं पाहिजे : रामदास फुटाणे

सरकारनामा ब्युरो

जामखेड (नगर) : "आपला देश भावुक आणि भाविक आहे. मात्र, मतदारांनी आता बदलले पाहिजे. येथे स्वप्न विकणाऱ्यांची गर्दी आहे. मात्र, आर्थिक विचार केला पाहिजे आणि रोहित पवारसारख्या चांगल्या माणसापाठी उभं राहिलं पाहिजे,'' असे आवाहन जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे यांनी केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार रोहित पवार यांच्या समर्थनार्थ आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भूमिका मांडली. पालकमंत्री राम शिंदे यांच्या कारभारावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. फुटाणे यांना साहित्य आणि राजकीय वर्तुळात मानाचे स्थान आहे. पवार यांना साहित्य कला, साहित्य क्षेत्रातूनही प्रतिसाद मिळत आहे.

फुटाणे म्हणाले, "गेल्या पंधरा वर्षांत जामखेडच्या राजकारणात मी लक्ष घातले नाही. मात्र, रोहित पवारांसारखा दूरदृष्टी असलेला युवा नेता येथून निवडणूक लढवत आहे, मग त्याच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. पंधरा-वीस वर्षांत दोन्ही तालुक्‍यांना सक्षम नेतृत्व मिळाले नाही. त्यामुळे येथे विकास झाला नाही. इथली माणसं काम करीत नसतील आणि बारामतीवरून येऊन एखादा माणूस चांगलं काम करीत असेल, तर त्याच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे. शरद पवार, अजित पवारांनी बारामती भागात खूप चांगला विकास केला. रोहित पवारांनी जाणीवपूर्वक कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ निवडला आहे. ते या भागाचा कायापालट करतील. त्यांच्या पाठीशी दोन्ही तालुक्‍यांनी उभे राहिले पाहिजे.''

फुटाणे म्हणाले, सरकारविरोधात कर्जतसह राज्यात खूप मोठा रोष आहे. त्यामुळे निवडणूक निकालानंतर नक्कीच परिवर्तन होईल. भाजपने सत्तेत आल्यानंतर गांधी-नेहरू द्वेष पसरविण्याचे काम केले. मात्र, चांगल्या कामाची संधी असताना द्वेषापोटी वेळ वाया घालवला. कॉंग्रेस संपविण्याच्या नादात सरकार कर्तृत्व विसरलं आहे. पंधरा वर्षे कधीही कोणाबद्दल काही बोललो नाही; मात्र या सरकारच्या माध्यमातून सांगण्यात येणारी खोटे आकडेवारी ऐकल्यानंतर संताप होतो. चांगली माणसं राजकारणात असली पाहिजे, असं वाटतं.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT