नगर

नगरमध्ये भाजपचे उमेदवार विखेंनीच पाडले? : सुजय म्हणाले नो काॅमेंटस्

सरकारनामा ब्यूरो

नगर : भाजप-शिवसेना महायुतीच्या कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्यासाठीच विधानसभा निवडणुकीपूर्वी "बारा- शून्य'चा नारा दिला होता. मात्र, त्यात अपेक्षित यश मिळाले नाही. आता त्याची कारणे शोधावी लागतील. आगामी पाच वर्षे भाजपचेच सरकार सत्तारूढ होणार असल्याचा दावाही खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला.

परतीच्या पावसाने झालेले नुकसान, उड्डाणपूल, बाह्यवळण रस्त्यासह विविध प्रश्‍नांवर आज डॉ. विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना डॉ. विखे पाटील म्हणाले, ""विधानसभा निवडणुकीत पक्षाने सोपवलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. जिल्ह्यात आणि राज्यात काही जागा गमवाव्या लागल्या. मात्र, भाजपची कामगिरी समाधानकारक आहे. राज्यात मतांचा स्ट्राईक रेट 70 टक्‍के आहे. विरोधकांचा 40 ते 45 टक्के आहे. शिर्डी मतदारसंघातील मताधिक्‍यांत वाढ झाली. जिल्ह्यात पक्षसंघटनेची पुनर्बांधणी करण्यात येईल.''

ते म्हणाले, ""परतीच्या पावसाने जिल्ह्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे सुरू केल्याचे सांगितले. शहरातील उड्डाणपुलासाठी 18 कोटींचा निधी मिळाला आहे. त्यासाठी भूसंपादनाचे काम सुरू आहे. बाह्यवळण रस्त्यासाठी 100 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. निंबळक परिसरातील लोकांना मोबदला व रस्त्याचे काम त्यातून करण्यात येईल.''

वेगळा पक्ष चालवित नाही

जिल्ह्यातील भाजप उमेदवारांच्या पराभवात विखेंचाच हात असल्याच्या "पोस्ट' सोशल मीडियातून फिरत आहेत. त्यावर डॉ. विखे पाटील म्हणाले, ""या "पोस्ट'वर काहीही भाष्य करणार नाही. विखे भाजपचेच आहे. ते वेगळा पक्ष चालवित नाहीत. आमदार शंकरराव गडाख यांना आपण मुख्यमंत्र्यांकडे घेऊन गेल्याच्या चर्चेतही तथ्य नाही. शिवसेनेला समर्थन देण्याचा निर्णय हा गडाखांचा वैयक्तिक आहे.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT