Which New Road Radhakrishna Vikhe to opt
Which New Road Radhakrishna Vikhe to opt 
नगर

विखेंचा 'नया रास्ता' श्रीरामपूर पुरताच मर्यादित?

सरकारनामा ब्युरो

शिर्डी : 'चलो एक पहल की जाए, नए रास्ते की ओर' असा मजकूर फलकावर होता. आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रीरामपुरात जाऊन, कार्यकर्त्यांच्या साक्षीने या मजकुराखाली स्वाक्षरी ठोकली. नंतर लगेचच राजकीय क्षेत्रात उलटसुलट चर्चा सुरू झाली. विखे पाटील यांनी कॉंग्रेसचा रस्ता सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. आता घाईने दुसरा कुठला 'नवा रस्ता' ते शोधणार, असा प्रश्‍न राजकीय निरीक्षकांना पडला. तथापि, 'हे वाक्‍य केवळ श्रीरामपूरपुरते मर्यादित आहे. त्याचा वेगळा अर्थ लावू नये,' अशी भूमिका विखे समर्थकांनी घेतली आहे.

नगर लोकसभा मतदारसंघातून भाजपने उमेदवारी दिली. डॉ. सुजय विखे पाटील खासदार झाले. त्यानंतर विरोधी पक्षनेतेपद असताना विखे पाटील भाजपवासी झाले. त्यांनाही मंत्रिपद मिळाले. पुढे विधानसभा निवडणुकीत भाजप व शिवसेनेला बहुमत मिळाले. युतीचे सरकार आले असते, तर विखे पाटील यांचे मंत्रिपद पक्के होते; मग भाजपमध्ये जाण्याचा विखे पाटील यांचा निर्णय चुकला असे कसे म्हणता येईल? त्यामुळे नवा रस्ता शोधण्याचा प्रश्‍नच येत नाही. 'नवा रस्ता' हा शब्दप्रयोग श्रीरामपूरपुरता मर्यादित आहे. तेथील जनसंपर्क कार्यालयाच्या मंडपाची झालर केशरी आणि हिरव्या रंगाची होती, यातच सर्व काही आले...' अशी स्पष्ट भूमिका विखे समर्थक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

मंत्री बाळासाहेब थोरात यांचे समर्थक असलेले श्रीरामपूरचे उपनगराध्यक्ष करण ससाणे यांचा गट व विखे पाटील यांना मानणारा गट यांच्यात जोरदार राजकीय संघर्ष सुरू आहे. बाजार समिती आणि पंचायत समितीवर कब्जा केल्यानंतर विखे गटाचे लक्ष आता नगरपालिकेकडे, म्हणजे ससाणे यांच्याकडे आहे. त्यादृष्टीने व्यूहरचना आखली जात आहे. राजकीय मोहरे गळाला लावले जात आहेत. या राजकारणाचा संदर्भ या फलकाला आहे.

काही राजकीय निरीक्षकांच्या मते, "विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या भाजपच्या उमेदवारांनी अपयशाचे खापर विखे पाटील यांच्यावर फोडून त्यांच्या विरोधात मोहीम सुरू केली. त्यापाठोपाठ जिल्हाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी त्यांना विश्‍वासात घेतले नाही. केडर बेस पक्ष असल्याने त्यांच्या व्यक्तिकेंद्रित राजकारणास मर्यादा येत आहेत. त्यामुळे अस्वस्थ असलेल्या विखे पाटील यांनी या फलकाच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या नाहीत ना! त्यांच्याकडे इलेक्‍टिव्ह मेरिट आहे. राज्य पातळीवर राजकीय स्थित्यंतराची वेळ आली, तर जबाबदारी घेण्याची क्षमता असलेल्या नेत्यांमध्ये त्यांचे नाव आहे. त्यामुळे पक्षांतर्गत विरोधकांना इशारा आणि पक्षश्रेष्ठींचे लक्ष्य वेधण्यासाठी त्यांनी नव्या रस्त्याच्या शोधाचा इशारा दिला असावा,' असेही काहींचे मत आहे.

श्रीरामपूर संपर्क कार्यालयात ज्या फलकावर मी स्वाक्षरी केली, त्यावरील मजकूर केवळ श्रीरामपूर शहर व मतदारसंघाशी संबंधित आहे. आम्हाला श्रीरामपूरला नवी दिशा द्यायची. नव्या वाटेने घेऊन जायचे, असा त्याचा आशय आहे. मी निवडलेला राजकीय रस्ता योग्य आहे. तो बदलण्याची गरज नाही - आमदार राधाकृष्ण विखे पाटील
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT