balasaheb thorat
balasaheb thorat sarkarnama
नागपूर

बाळासाहेब थोरात म्हणाले, काँग्रेसला पुन्हा सोनियाचे दिवस येतील 

सरकारनामा ब्युरो

वर्धा : विधानसभेचे माजी उपाध्यक्ष प्रमोद शेंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण आज विधिमंडळ पक्षनेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या हस्ते झाले. या वेळी पशुसंवर्धन मंत्री व पालकमंत्री सुनील केदार, महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर, माजी मंत्री रणजित कांबळे, माजी मंत्री अनिस अहमद, आमदार अभिजित वंजारी, माजी आमदार अमर काळे, शेखर शेंडे, अशोक शिंदे, सुरेश देशमुख, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस रामकिशन ओझा, वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज चांदूरकर यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. Balasaheb Thorat said, Congress will have golden days again

या प्रसंगी नाना पटोले म्हणाले, केंद्रातील नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचे सरकार शेतकरीविरोधी आहे. त्यांच्या शेतकरी विरोधी धोरणामुळेच सोयाबीनचे भाव घसरले आहेत. देशात सोयाबीनचे भरघोस पीक होत असताना आणि चार पैसे हातात येण्याची आशा शेतकऱ्यांना दिसत असतानाच केंद्र सरकारने विदेशातून सोयाबीन आयात केले. केंद्राच्या या निर्णयामुळेच बाजारात सोयाबीनची किंमत मातीमोल झाली आहे.

प्रमोदबाबू हे सामान्य लोक, शेतकरी, कष्टकरी यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न आग्रहाने मांडून त्यांना न्याय देण्याचे काम करत असत. आज कापूस, सोयाबीनच्या घसरत्या किमती पाहून त्यांनी सरकारला जाब विचारला असता. शेतकऱ्यांवर प्रमोदबाबूंचा विशेष जीव होता, शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये अशी त्यांची भूमिका असायची. जनतेसाठी, लोकांच्या हितासाठी काम करणारे प्रमोदबाबूंचे व्यक्तिमत्व होते. महात्मा गांधी, विनोबा भावे, संत गाडगेबाबा यांचा विचार असलेल्या या भूमीत प्रमोदबाबूंचा पुतळा आम्हाला नेहमीच मार्गदर्शक ठरले असे पटोले म्हणाले.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, महात्मा गांधींचा विचार या भूमीत रुजलेला आहे, एकीकडे गांधींचा विचार व दुसरीकडे विकासाचा विचार याची सांगड घालण्याचे काम प्रमोदबाबूंनी केले. प्रमोदजी हे समाजजीवनाशी एकरुप झालेले नेतृत्व होते. राज्याच्या राजकारणात ज्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला त्यात प्रमोदबाबूंचे नाव वरच्या क्रमांकावर असेल. सामान्य लोकांच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी झटत त्यांनी विदर्भातील प्रकल्प मार्गी लागले पाहिजेत यासाठी ते नेहमी आग्रही राहिले. त्यांच्याकडे असलेल्या पदांचा वापर त्यांनी नेहमी विकास कामांसाठी केला.

देशात आज राज्यघटनेच्या विचाराची अवहेलना होत आहे. राज्यघटना मोडित काढण्याचे काम सुरु झाले आहे. विविध संस्थांचा वापर राजकारणासाठी होत आहे. वर्षभरापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन सुरु आहे, त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत पण त्यांच्याकडे पाहण्यास पंतप्रधानांना वेळ नाही. काँग्रेसने मिळवलेले सर्व संपवण्याचे काम सुरु आहे, असे असताना आपण अस्वस्थ होणार नसाल तर पुढचा काळ तुम्हाला अस्वस्थ करणारा असेल.

धर्माच्या नावावर राजकीय पोळी भाजण्याचे काम सुरु आहे. हे चित्र बदलावे लागणार आहे, त्यासाठी पुन्हा जोमाने उभे रहायचे आहे आणि पुन्हा एकदा देशात सोनियाचे दिवस आणायचे आहेत, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT