Tarik Qureshi
Tarik Qureshi 
नागपूर

भंडारा भाजप जिल्हाध्यक्ष बदलण्याची शक्‍यता? 

सरकारनामा ब्युरो

नागपूर-भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजप या मतदारसंघात काही संघटनात्मक फेरबदल करण्याची शक्‍यता आहे. यात भाजपचे भंडारा जिल्हाध्यक्ष तारीक कुरेशी यांना बदलण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. प्रदेश भाजपने त्यांना मुंबईला पाचारण केले होते. 

गेल्या निवडणुकीत भाजपने या मतदारसंघावर वर्चस्व प्रस्थापित केले होते. नाना पटोले यांनी राजीनामा देऊन कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याने हा मतदारसंघ राखण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व भंडाऱ्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रयत्न करूनही भाजपला या पोटनिवडणुकीत माती खावी लागली. भंडारा जिल्ह्यातील तिन्ही आमदार भाजपचे आहेत. त्यापैकी साकोली (बाळा काशीवार) व तुमसर (चरण वाघमारे) यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराला तब्बल 27 हजार हजार मतांची आघाडी मिळाली आहे. भंडारा मतदारसंघातही केवळ दोन हजार मतांची आघाडी भाजपच्या उमेदवाराला आहे. 

हा पराभव वर्मी लागल्याने प्रदेश भाजपने भंडारा भाजपचे जिल्हाध्यक्ष तारीक कुरेशी यांना मुंबईत पाचारण केले होते.  या पराभवाबद्दल सविस्तर अहवाल कुरेशी यांनी सादर केला. यात विरोधक एकत्र आल्याने; तसेच जातीचे ध्रुवीकरण झाल्याने भाजपचा पराभव झाल्याचे नमूद केले आहे. या अहवालाने प्रदेश भाजपचे पदाधिकारी फारसे खूश नसल्याचे समजते. भंडारा जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्षांच्या विरोधात नाराजी व्यक्त केल्याचे समजते. भंडारा जिल्हाध्यक्षांना पद सोडण्याचे आदेश मिळण्याची शक्‍यता आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT