यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी पांढरकवडा येथे महिला बचत गटांच्या अधिवेशनासाठी आले होते. परंतु त्यांनी भाषणात महिला बचत गटाच्या संदर्भात कोणताही उल्लेखही केला नाही. त्यामुळे महिला बचत गटांची दिशाभूल केल्याचा आरोप कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजीमंत्री शिवाजीराव मोघे यांनी पत्रकार परिषदेत केला.
पांढरकवडा येथे महिला बचत गटाच्या संमेलनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारला आले होते. या कार्यक्रमात महिला बचत गटाच्या महिलांसाठी काही योजनांची घोषणा होईल, अशी अपेक्षा होती. परंतु पंतप्रधान मोदींनी अख्ख्या भाषणात महिला बचत गटाचा उल्लेखही केला नाही. केवळ राजकीय भाषण देण्यासाठी ते पांढरकवडा येथे आले होते, असा आरोप मोघे यांनी केला. हा शासकीय कार्यक्रम असताना भाजपच्या नेत्यांनी संपूर्ण सभेत भाजपचे झेंडे लावले होते. सरकारच्या पैशांनी भाजपचा कार्यक्रम झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी "गो बॅक मोदी'चे फलक पांढरकवडा शहरात लावले होते, तसेच मोदींच्या आगमनाच्या निषेधार्थ काळे फुगे हवेत सोडले, असा दावा मोघे यांनी केला.
दाभडी येथे पाच वर्षांपूर्वी आल्यानंतर पांढरकवडा येथील सभेबद्दल लोकांमध्ये उत्सुकता होती. परंतु मोदी यांनी केवळ राजकीय भाषण करून जनतेचा भ्रमनिरास केल्याचा आरोपही त्यांनी केला. देश संकटात असताना केवळ निवडणुका जिंकण्याच्या इराद्याने त्यांनी पांढरकवडा येथील दौरा केला. गेल्या पाच वर्षांत शेतकऱ्यांसाठी या सरकारने काहीही केले नाही. येत्या निवडणुकीत जनताच या सरकारला धडा शिकविणार असल्याचा दावा मोघे यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.