Mahesh Mendhe - Vijay Vadettiwar 
नागपूर

कॉंग्रेसच्या 'एबी'फार्मसाठी आर्थिक व्यवहार! महेश मेंढेंचा गंभीर आरोप

सरकारनामा ब्युरो

चंद्रपूर : आमदार किशोर जोरगेवार यांनी भाजपचा हात पकडल्यानंतर त्यांच्या पाठीशी उभे राहिलेले काँग्रेसचे स्थानिक नेते चांगलेच तोंडघशी पडले आहेत. हीच संधी साधत कॉंग्रेसचे पराभूत उमेदवार महेश मेंढे यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर गंभीर आरोप केले. जोरगेवार यांना कॉंग्रेसचा 'एबी'फार्म देताना मोठा आर्थिक व्यवहार झाला, असा मेंढे यांचा दावा आहे.

चंद्रपुरात कॉंग्रेसच्या उमेदवारीवरून मोठे नाट्य रंगले होते. कॉंग्रेसने महेश मेंढे यांना अधिकृतरीत्या उमेदवारी जाहीर केली. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या काही तासांपूर्वी अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांना एबीफार्म देण्यात आला. मेंढे आणि जोरगेवार दोघांनीही कॉंग्रेसचे एबीफार्म जोडले होते. अपक्ष म्हणून जोरगेवार प्रचंड मताधिक्‍याने विजय झाले. मेंढे चवथ्या स्थानावर फेकले गेले. आता जोरगेवार यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे त्यांच्या पाठीमागे निवडणूक काढत उभे राहणाऱ्या कॉंग्रेस नेत्यांची चांगलीच नाचक्की झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर मेंढेनी आरोप केले आहेत. विधानसभेच्या निकालानंतर वडेट्टीवार यांनी पक्षनेतृत्वावर तिकीट वाटपावरून टीका केली होती. याच टीकेचा आधार घेत मेंढेंनी वडेट्टीवार यांच्यावर टीकास्त्र सोडले.

चंद्रपूर विधानसभेची उमेदवारी कॉंग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने मला तीन ऑक्‍टोबरला 2019 दिली. त्यात विदर्भातील कुठल्याही नेत्याचा सहभाग नव्हता. चार ऑक्‍टोबरला सकाळी 9 वाजता विजय वडेट्टीवार यांच्याकडून प्रकाश देवतळे मला 'एबी' फाॅर्म देतील असे सांगण्यात आले. मात्र मला 'एबी' फाॅर्म न देता अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांना देण्यात आला. त्यासाठी कॉंग्रेस कमेटीची कुठलीही परवानगी घेण्यात आली नव्हती. परस्पर अपक्ष उमेदवारला 'एबी' फाॅर्म देण्यात आला. यात मोठा आर्थिक व्यवहार झाला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी मेंढे यांनी पक्षनेतृत्वाकडे केली. 

''सोबतच कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना किशोर जोरगेवार यांचे काम करण्याचे आदेश दिले. कॉंग्रेसच्या अधिकृत उमेदवारला पाडण्यासाठी ताकद पणाला लावली. विदर्भातील इतर वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या मनाप्रमाणे तिकीट दिली नाही, असा त्यांचा दावा आहे. मात्र, वडेट्टीवार स्वतः: स्क्रीनिंग कमेटीचे सदस्य होते. चंद्रपुरात मला दिलेली उमेदवारी चुकीची होती, असेही ते म्हणतात. मात्र मला केंद्रीय नेतृत्वाने उमेदवारी दिली होती. त्यांच्यावर अपयशाचे खापर फुटणार आहे. त्यामुळे ते पक्षनेतृत्वावर टीका करीत आहेत; चंद्रपुरात सुद्धा ते प्रचारासाठी का आले नाही?'' असाही प्रश्‍न मेंढे यांनी उपस्थित केला आहे.

कॉंग्रेसचे शहराध्यक्ष नंदू नागरकर आणि महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रकाश देवतळे यांना पक्षाच्या उमेदवारा विरोधात प्रचार करायला लावले. त्यामुळे वडेट्टीवारांना पक्षनेतृत्वावर टीका करण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही. भविष्यात वडेट्टीवारांना कुठलीही मोठी जबाबदारी देण्यात येऊ नये, अशी मागणीही मेंढे यांनी पक्षनेतृत्वाकडे केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT