Eknath Khadse - Jayant Patil
Eknath Khadse - Jayant Patil  
नागपूर

एकनाथ खडसे आले जयंत पाटलांच्या मदतीला..

सरकारनामा ब्यूरो

बुलडाणा : राज्याचे जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा सध्या विदर्भात आहे. आज बुलडाणा जिल्ह्यात कार्यकारिणीच्या सभेत जयंत पाटलांनी आढावा घेतला. यावेळी माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे जयत पाटलांच्या मदतीला आले आणि त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. 

खडसे म्हणाले, मला गेल्या अनेक वर्षांचा संघटना चालवण्याचा अनुभव आहे. एकोप्याने राहिलं तर पक्ष वाढतो, एकमेकांचे पाय ओढण्यात अर्थ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक चांगले पदाधिकारी थांबले आहेत. कोविडमुळे त्यास विलंब झाला असला तरी लवकरच त्यांचा पक्षप्रवेश करण्यात येईल. बुलडाणा जिल्ह्याची सामाजिकरित्या, राजकीयरित्या मला चांगली माहिती असल्याने पक्ष कुठे कमकुवत आहे, कुठे बलाढ्य आहे याची मला जाण आहे. त्यामुळे जिथे आपण कमकुवत आहोत तिथे लक्ष केंद्रित करायला हवे.

केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलचे भाव वाढवले आहेत. त्यांच्या विरोधात जनमानसाला सोबत घेऊन आंदोलन करायला हवे. महाविकास आघाडी चांगलं काम करत आहे. सरकार आपलं असलं तरी लोकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करा, शासन दरबारी दाद मागा. आपले नेते खासदार शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासारखे मार्गदर्शक आपल्याकडे आहेत. आपण एकजुटीने पक्ष वाढीसाठी एक व्यापक कार्यक्रम हाती घेऊ, असे आवाहन खडसे यांनी कार्यकर्त्यांना केले. 

यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, संदीप बाजोरीया, विदर्भ दौरा समन्वयक प्रवीण कुंटे पाटील, विनायक पाटील, बुलडाण्याचे जिल्हाध्यक्ष अॅड. नाझिर काझी, महिला जिल्हाध्यक्ष अनुजा सावळे, युवक जिल्हाध्यक्ष शेखर बोंद्रे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष भूषण दाभाडे, युवती जिल्हाध्यक्ष मिरा बावस्कर, बुलडाणा विद्यार्थी अध्यक्ष नरेश शेळके, अॅड. सरदार आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT