नागपूर

अमरावती एसडीओ कार्यालयात शेतकऱ्यांनी घुसवले बैल

सरकारनामा ब्युरो

अमरावती ः वारंवार अर्ज विनंत्या करूनसुद्धा शेती वहीवाटीचे पांदण रस्ते सुरू केले नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी काल अमरावती उपविभागीय कार्यालयात बैलजोड्या घुसविल्याने एकच खळबळ उडाली.

पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर बैलांना कार्यालयाबाहेर काढण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. एका बैलजोडीने थेट अधिकाऱ्यांच्या कक्षातच शेण टाकले. त्यामुळे आंदोलनानंतर कर्मचाऱ्यांना शेण उचलून कक्षाची साफसफाई करावी लागली.

यंदा अतिपावसामुळे पांधण रस्त्यांची कामे झाली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नुकसान झाले. प्रशासनाकडून पांधणरस्ते विकास योजनाचा प्रचंड गाजावाजा करण्यात आला होता, मात्र ते तयार करण्यात प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली करण्यात आल्या नाहीत, असा आरोप प्रकाश साबळे यांच्यासह शेतकऱ्यांनी केला. 

अमरावती तालुक्‍यातील 158 पांधण रस्त्यांचे प्रस्ताव मागील तीन वर्षांपासून प्रलंबित आहेत. कृषी उद्योगाची प्रगती होण्यासाठी किमान शेतीचे वहीवाटीचे कच्चे रस्ते करणे गरजेचे आहे; मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी काय करावे, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला.

अमरावती उपविभागीय कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी सुरुवातीला धरणे दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्यासोबतच आणलेल्या बैलजोड्या एसडीओंच्या कक्षात घुसविण्याचा प्रयत्न सुरू केला. तेथे उपस्थित पोलिसांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकरी काहीच ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते आणि बौलजोड्या थेट एसडीओंच्या कक्षात घुसविल्या. त्याठिकाणी प्रकाश साबळे यांचा अधिकाऱ्यांसोबतच वादसुद्धा झाला. मात्र पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर अधिकारी कक्षाबाहेर चर्चेसाठी आले आणि तेव्हा कुठे बैल बाहेर काढण्यात आले.

या आंदोलनात बाळकृष्ण धर्माळे, राजेंद्र उमेकर, समीर जवंजाळ, राजेश बनारसे, राजू लोखंडे, मनीष धुर्वे, नवनीत उमेकर, सचिन अढावू, वैभव डवरे, सूर्यभान पारिसे, भीमराव मेश्राम, विजय वाकेकर, विश्‍वास डुकरे, रवींद्र समरित, उमेश घाटे आदींसह अन्य सहभागी झाले होते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT