Bhagatsingh Koshyari - Prafull Patel
Bhagatsingh Koshyari - Prafull Patel 
नागपूर

राज्यपाल म्हणाले, उत्तराखंडात घोडा बिडी बंद करून विमान का नाही उडवले...

Abhijeet Ghormare

गोंदिया : व्यवसायात जशी स्पर्धा असते, तशी ती राजकारणातही असतेच. मग व्यावसायिक स्पर्धक एकमेकांच्या घरी किंवा लग्नाला जात नाहीत का? जातातच ना.. नेमकी तीच स्थिती राजकारणातही आहे. राज्यातील सर्व राजकीय पक्षांची एकमेकांशी स्पर्धा आहे. ती असलीही पाहिजे. पण आपण एकमेकांच्या घरी गेलो पाहिजे, विचारांचे, संस्कृतीचे आदानप्रदान केले पाहिजे, असे राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी म्हणाले. 

मनोहरभाई पटेल यांच्या ११५ व्या जयंती सोहळ्यानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी राज्यपाल कोश्‍यारी आज गोंदियात आले होते. ते म्हणाले, प्रफुल्ल पटेल येथे व्यवसाय करतात आणि गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयसुद्धा चालवतात. नववैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी त्यांनी मोठे इन्स्टिट्यूट तयार केले आहे. जागतिक दर्जाचे विमानतळ त्यांनी तयार केले आहे. गप्पा मारताना त्यांनी मला सांगितले की, तुमच्या उत्तराखंडमध्ये आमची घोडा बिडी फार चालते. त्यावर मी त्यांना म्हणालो की, मी बिडी ओढत नाही. तुम्ही मंत्री होता तेव्हा उत्तराखंडमध्ये घोडा बिडी बंद करून असेच विमान का नाही उडवले? 

गोंदियात येण्याची इच्छा पूर्ण झाली  
मी संघाचा स्वयंसेवक आहे. ‘मान न मान, मै तेरा मेहमान’ अशा वातावरणात आपण वावरलो आहोत. कोणाच्याही घरी जबरीने लोकांचे आतिथ्य घेणे ही प्रचारक असतानाची आपली भूमिका होती. तेव्हा कोणीही बोलावल्यास त्याठिकाणी जाणे अगत्याचेच होते. प्रफुल्ल पटेल यांनी बोलावले, म्हणून गोंदियाला येता आले. आपले प्रचारक विश्‍वनाथ लिमये हे गोंदियाचेच असल्याने गोंदियाला येण्याची आपली फार पूर्वीपासूनची इच्छा होती. ही इच्छा पूर्ण झाली. असे राज्यपाल म्हणाले. 

आज राज्यपालांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदक वितरण सोहळा येथील नमाद महाविद्यालयाच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासह हरिहरभाई पटेल प्रामुख्याने उपस्थित होते. राज्यपाल कोश्‍यारी म्हणाले की, मनोहरभाई पटेल यांनी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात शैक्षणिक क्रांती घडवून आणली. त्यांच्यात एक दिव्यगुण, अलौकिक सात्त्विक गुण होते. त्यांच्या परिश्रमाने व तपस्याने गोंदिया शिक्षण संस्थेचे वटवृक्षात रूपांतर झाले. प्रफुल्ल पटेलांनी त्यांचा हा शैक्षणिक वारसा जोपासला असून, हा वारसा ते पुढे नेत आहेत.
 
राज्यपाल म्हणाले, पदक प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये मुलींची संख्या जास्त आहे. आज शिक्षणात मुलींनी मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे. ग्रामीण भागातील महिलांनीसुद्धा आपल्या कर्तृत्वाने विविध क्षेत्र पादाक्रांत केली आहेत. मातृशक्तीचा हा जागर शैक्षणिक क्रांतीमुळेच शक्‍य झाला. यावेळी त्यांनी प्राथमिक व महाविद्यालयीन आठवणींना उजाळा दिला. दरम्यान, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्‍वास" हा कानमंत्र असून, या कानमंत्रावर प्रफुल्ल पटेल चालत आहेत, असे राज्यपाल कोश्‍यारी म्हणताच सभागृहात एकच हंशा पिकला. माजी आमदार राजेंद्र जैन यांनी कार्यक्रमाचे संचालन केले व उपस्थितांचे आभार मानले.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT