गडचिरोली : नर्मदाक्का. मूळ नाव उप्पुगुंटी निर्मलाकुमार. गडचिरोली जिल्ह्याला लागलेल्या नक्षलवादी चळवळीची सूत्रधार. तब्बल दोन दशके ती घनदाट दंडकारण्यात मोकळी फिरत होती. पोलिसांचे, सुरक्षा जवानांचे बळी घेत होती. पोलिस तिच्यापर्यंत पोचू शकत नव्हते. पण, अखेर वय आणि आजाराने ती खचली अन् अलगद ती पोलिसांच्या तावडीत सापडली. तिच्या अटकेने धगधगते दंडकारण्य शांत व्हायला लागेल, अशी आशा व्यक्त होत आहे.
नर्मदाक्का आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील कोडापावनुरू येथील रहिवासी. तिचे वडील कम्युनिस्ट चळवळीतील. नक्षल चळवळीचे जनक चारू मुजुमदार यांच्या विचाराने ते प्रेरित झाले होते. तेच संस्कार नर्मदाक्कावर झाले. तरुण वयात तिने नक्षल संघटनेत प्रवेश केला. तिच्याकडे गडचिरोली, गोंदिया, छत्तीसगड राज्यात, म्हणजेच दंडकारण्यात नक्षल चळवळ उभारण्याचे काम सोपविण्यात आले. 1982 मध्ये नर्मदाक्काच्या नेतृत्वात या भागात नक्षल चळवळीला प्रारंभ झाला. न्याय, हक्क, जंगल व जमिनीचा अधिकार मिळवून देण्याची हमी देत तिने आदिवासींमध्ये लोकप्रियता मिळविली. त्यामुळेच या भागातील आदिवासी बांधव तिला आक्का म्हणजे मोठी बहीण असे म्हणायला लागले. नर्मदाक्काने शेकडो आदिवासी तरुणींना नक्षल चळवळीत ओढले. तिच्यामुळेच नक्षली दलममध्ये महिला नक्षलवाद्यांचा दबदबा राहिला.
गेल्या 21 वर्षांत एकट्या नर्मदाक्काने 40 जवान व 90 नागरिकांच्या हत्या करून दंडकारण्यात नक्षल चळवळीची लाल दहशत निर्माण केली. सुरक्षा दलाच्या बारा हजार पोलिसांना तिने जेरीस आणले होते.
गडचिरोली जिल्ह्यातील भूसुरुंगाच्या सहा मोठ्या घटनांसह 65 लहान-मोठ्या हिंसाचाराच्या घटनांची सूत्रधार नर्मदाक्काच होती, असे पोलिस म्हणतात. वाढते वय आणि कर्करोगासारखा दुर्धर आजार याने ती हवालदिल झाली होती. गेल्या काही दिवसांपासून केवळ मार्गदर्शक म्हणूनच तिची दलममध्ये भूमिका होती. पोलिसांनी तिला पती राणी सत्यनारायण ऊर्फ किरण ऊर्फ किरणदादा याच्यासोबत अटक केल्याने नक्षल चळवळ नेतृत्वहीन झाली आहे.
नर्मदाक्काच्या नेतृत्वाखालील नक्षली कारवाया
2009 - हत्तीगोटा चकमकीत 16 जवान हुतात्मा
2010 - लाहेरी येथील चकमकीत 17 जवान हुतात्मा
2016 - सुरजागड पहाडावर झालेली 80 वाहनांची जाळपोळ, जोगनगुडा येथील दोन शिक्षकांच्या हत्या
2019 - काही दिवसांपूर्वी भूसुरुंग स्फोटात 15 जवान हुतात्मा
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.