नागपूर

जिल्हा परिषद सदस्यांच्या अनुपस्थितीने बावनकुळे नाराज

निलेश डोये

नागपूर : नागपूर जिल्हा परिषदेची निवडणुकीची घोषणा लवकरच होण्याची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलाविलेल्या बैठकीला भाजपच्या जिल्हा परिषद सदस्यांनी सामुहिक दांडी मारली. नागपूर जि.प.मधील भाजपच्या केवळ 5 सदस्यांनी या बैठकीला हजेरी लावल्याने बावनकुळे चांगलेच नाराज झाल्याचे समजते.

नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक न्यायालयीन वादामुळे जवळपास एक वर्ष रेंगाळली. न्यायालयाने आता निवडणुकीचा मार्ग मोकळा केल्याने लवकरच निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्‍यता आहे. या निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविभवनात भाजपच्या जि. प. सदस्यांची बैठक आयोजित केली होती. नागपूर जिल्हा परिषदेत भाजपचे 21 सदस्य आहेत. शिवसेना व बसपाच्या मदतीने भाजप गेल्या 6 वर्षांपासून सत्तेत आहे. राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतरही केवळ नागपूरच्या विकासासाठी निधी दिला जात आहे. ग्रामीण भागांच्या विकासासाठी निधी मिळत नसल्याचा आरोप जि.प. सदस्य करीत होते. विकास कामे होत नसल्याने सदस्यांमध्ये नाराजी होती. ही नाराजी निवडणुकीत दिसून येईल, असे बोलले जात होते. यामुळे भाजपच्या 16 सदस्यांनी बैठकीला न जाणे पसंत केल्याचे बोलले जात आहे.

हा असंतोष दूर करण्यासाठीच बावनकुळे यांनी जि. प. सदस्यांची बैठक आयोजित केली होती. जि. प. अध्यक्ष निशा सावरकर यांच्या कारभारावरही सदस्य नाराज आहेत. त्यांचे पती टेकचंद सावरकर जि. प.च्या कारभारात हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप अनेकांनी यापूर्वीच केला आहे. गेल्या पाच वर्षात सदस्यांना निधी मिळालेला नसल्याचा त्यांचा आरोप आहे. जि. प. सदस्यांच्या या भूमिकेमुळे येत्या निवडणुकीत नाराज सदस्य भाजपसोडून जाणार तर नाही ना? या शंकेने जिल्ह्यातील भाजपचे नेते चिंताग्रस्त आहेत. बहुसंख्य जि. प. सदस्य काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले आहेत. त्यांची 'घरवापसी' होणार नाही, यासाठी आता भाजपचे नेते कामाला लागल्याचे समजते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT